नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पाथर्डी गाव व देवळाली कॅम्प येथील दोन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंगाचा पहिला प्रकार गौळाणे ते पाथर्डी रोड येथे घडला. फिर्यादी महिला ही पतीला झालेल्या मारहाणीबाबत विचारपूस करण्यासाठी गौळाणे-पाथर्डी रोड येथील साहिल अपार्टमेंटसमोर गेली होती. त्यावेळी आरोपी दिनेश पोरजे (रा. पोरजे मळा, पाथर्डी गाव, नाशिक) याने फिर्यादी महिलेजवळ येऊन तिचा डावा हात धरून श्रीमुखात मारली व शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिनेश पोरजे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद करीत आहेत.
विनयभंगाचा दुसरा प्रकार देवळालीतील हाडोळा परिसरात घडला. फिर्यादी महिला ही घरकाम करते. ही महिला कामावर जात असताना शनिवारी (दि. ७) दुपारी चार वाजेच्या सुमारास आरोपी फिरोज अजिज खान (वय ४८, रा. देवळाली कॅम्प) हा तिचा पाठलाग करीत होता. तिच्याशी वारंवार अश्लील बोलून फिर्यादी महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी करीत होता. तसेच फिर्यादी महिलेची रोज कामावर जाताना छेड काढतो. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी फिरोज खानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.