
अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात राज्य निवडणूक आयोगाने एक महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात आता १४ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल आगामी काळात वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील सुनावणीदरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यांत जाहीर करण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने हे परिपत्रक जारी केले आहे. मंगळवारीच सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला झटका देत तिथेसुद्धा स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जाहीर करण्यास सांगितले आहे.
राज्यातील नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या महापालिकांची मुदत संपली आहे. त्यामुळे या महापालिकांची प्रभाग रचना ही १७ मे रोजी जाहीर होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वेग
१० मार्च २०२२ रोजी राज्य सरकारने कायदा करत प्रभाग रचना निश्चित करण्याचे काम त्यांच्याकडे घेतले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचना जाहीर करणार आहे. १४ महापालिकांच्या निवडणुकीची प्रभागरचना जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १७ मे ही तारीख निश्चित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याचा वेळ दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या कामांना गती दिली आहे.