मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या वतीने जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध तबलावादक पदमभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’ (एलएलडी) व प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना ‘डॉक्टर ऑफ लीटरेचर’ (डिलिट) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
१२ मे २०२२ रोजी विशेष दीक्षान्त समारंभात राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत. हा विशेष दीक्षान्त समारंभ गुरुवार, दि. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या फोर्ट येथे सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठाने यावर्षी जागतिक कीर्तीचे तबलावादक पदमभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना एलएलडी ही मानद पदवी तसेच गरवारे उद्योजक समूहाचे प्रमुख शशिकांत गरवारे यांना डिलिट ही पदवी त्यांच्या कार्यातील योगदानाबद्दल देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्राधिकरणाने घेतला आहे.
यापूर्वी विद्यापीठाने प्रसिद्ध कृषितज्ज्ञ स्वामिनाथन यांना डिलिट ही मानद पदवी देण्यात आली होती. या समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.