Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीराणे, राणा दिसतात; मग शेख, पठाण दिसत नाहीत का?

राणे, राणा दिसतात; मग शेख, पठाण दिसत नाहीत का?

महापालिकेकडून आडनाव बघून कारवाई, आशिष शेलारांचा घणाघात

मुंबई : “बेहरामपाडा दिसत नाही आणि शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड करता. राणे, राणा दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत. ते अनिधिकृत नाहीत असे म्हणायचे आहे का? आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावे बघून केली जात आहे,” असा आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“शाहीन बाग आणि जहांगीरपुरीमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचे काम आहे. पण गेल्या २५ वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असलेल्या बेहरामपाडा इथे सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

“राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिकेकडून घरे तोडण्यासाठी नोटीस दिल्या जात आहेत. गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केले नाही का? हा जाती, धर्मभेद नाही; तर अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी आहे,” असे आशिष शेलार म्हणाले.

राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडतात, असा आरोपही यावेळी आशिष शेलार यांनी केला. राज्याची यंत्रणा राम भक्तांवर कारवाई करत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघाली आहे. हा फरक राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

मुंबई महापालिका अनधिकृत बांधकामांच्या कारवाईबाबत एकही शब्द काढत नाही किंवा कारवाई करत नाही. पण केंद्रीय यंत्रणा अवैध कामांवर कारवाई करतात, म्हणून मग महाविकास आघाडी सरकारकडूनही कारवाई केली जाते. त्यामुळे मुंबई महापालिका ही आडनाव बघून कारवाई करते असा घणाघात अशिष शेलार यांनी केला.

उत्तर प्रदेश सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार असल्यासंबंधी विचारले असता आशिष शेलार म्हणाले की, “योगींनी उत्तर प्रदेशात लता मंगशेकरांच्या नावे चौक केला. मग हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचा सन्मान नाही का?”.

“अयोध्येतील नगरपालिकेला जागा ठरवून लता मंगेशकरांचा सन्मान करा हे सांगणारे भाजपाचे सरकार आहे. मुंबईत भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम झाला आणि श्रद्धांजलीसाठी हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वाजवली. केंद्र सरकारच्या संस्कृती विभागाने यासाठी मदत केली आणि महाराष्ट्र सरकार झोपून होते. शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आहे आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिलेला नाही,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -