Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेआपत्ती प्रतिसाद यंत्रणेबाबत देणार सर्व जिल्ह्यांना प्रशिक्षण

आपत्ती प्रतिसाद यंत्रणेबाबत देणार सर्व जिल्ह्यांना प्रशिक्षण

मान्सूनपूर्व बैठकीत वडेट्टीवारांचे निर्देश

ठाणे (प्रतिनिधी) : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तत्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

सोमवारी कोकण व पुणे महसुली विभागातील जिल्ह्यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाली. यावेळी मंत्रालयातील कक्षातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार बोलत होते.

या बैठकीला मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन संचालक संजय धारूरकर यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे कोकण विभागीय उपायुक्त मकरंद देशपांडे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पी. बी. पाटील, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नारळीकर, पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, साताराचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) मुधोळकर तसेच दोन्ही विभागातील जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा ही राज्यात लागू करण्यात येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे. त्यामुळे या यंत्रणेसाठी लागणारे प्रशिक्षण व इतर माहिती जिल्ह्यांना तत्काळ पुरवावी, मान्सूनपूर्व बैठका, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, आपत्ती कालावधीत जीवितहानी होऊ नये याची खबरदारी आवश्यक, तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गतची कामे गतीने करावीत, अशा सूचना मंत्री वडेट्टीवार यांनी दिल्या.

यावेळी दोन्ही विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य आपत्ती निवारणासाठी तसेच पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -