मुंबई (प्रतिनिधी) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्ये देखील तितकीच महत्त्वाची असून या क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनिज) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात कौशल्य वृद्धीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, नॅसकॉमचे संचालक डॉ. चेतन सामंत, विजय चौघुले, सचिन म्हस्के, श्रीदेवी सिरा उपस्थित होते.
भारतासारख्या विकसनशील देशात सेवा क्षेत्र जलदगतीने वृद्धिंगत होत आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा लक्षणीय आहे. माहिती तंत्रज्ञानावर आधारित ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो या सारख्या कंपन्या, भीम, पेटीएम या सारखे ॲप, ‘आधार’ बेस्ड ई केवायसीच्या आधारे डिजिटल बँकिंग सारख्या सुविधा, रेल्वे, बस वाहतूक यांची ॲप आधारित सेवा, ग्राहकांची रुची, खरेदीचा पॅटर्न, खरेदीचे ठिकाण इत्यादी बाबींचे पृथक्करण करून मार्केटिंग करण्याचा सल्ला देणाऱ्या कंपन्या, स्मार्ट वातानुकूलित यंत्रे, स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित वाहने, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स अशा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योग्य प्रशिक्षण मिळाल्यास रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील.
सेवा क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि आज असलेली डिजिटल तंत्रज्ञानस्नेही तरुण पिढीची उपलब्धता लक्षात घेऊन हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी हा करार करण्यात आला आहे. यामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन सेवा क्षेत्रास भरीव योगदान दिले जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.
या सामंजस्य करारानुसार राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकलाशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग तंत्रज्ञान, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन शिक्षक यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंदाजे एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट या सामंजस्य कराराद्वारे निर्धारित केले .