Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरमनोर पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

मनोर पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

  • हलोली, चिल्हार, आवढणी, बेलपाडा, सातिवलीत छापे
  • तेल, भंगारमाफियांचे धाबे दणाणले
  • तलासरी, कासा परिसरात कारवाईची मागणी

बोईसर (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ म्हणजे अनेक माफियांचे कुरणक्षेत्रच बनले आहे. मात्र या महामार्गावरील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेल व भंगारमाफियांचे चालणारे अवैध धंदे पोलिसांनी शनिवारी बंद केले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. या कारवाईने मार्गालगत अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईनंतर मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्यावर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजही अवैध धंदे सुरूच असून, तिथे कारवाई करण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे. ढेकाळे ते मेंढवण परिसरात रात्री-अपरात्री पोलिसांची नजर चुकवून काही हॉटेल, ढाब्यांवर तेल व भंगारमाफिया लोखंड, सळई, भंगार, डांबर, डिझेल, पेट्रोल, इतर द्रव्ये लपूनछपून वाहनांमधून उतरवले जात होते. इतकेच नव्हे तर बायोडिझेलविक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा सर्व प्रकार घडत असल्याबाबतची खबर मनोर पोलीस ठाण्याचे प्रदीप कसबे यांना लागली होती. मात्र निश्चित वेळ आणि ठिकाण कळताच त्यांनी त्यांचे सहकारी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सह्याने हलोली, चिल्हार, आवढणी, बेलपाडा, सातीवली आदी ठिकाणी छापे टाकून सर्व धंदे बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली.

मुंबई – अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर ते तलासरीपर्यंत तेल व भंगार माफिया मोठ्या प्रमाणावर पुन्हा सक्रिय झाले असून, दररोज लाखो रुपयांचा माल अवैधरीत्या उतरवला जात आहे. यात सरकारी साधनसामुग्रीची चोरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईस सुरुवात केल्याने या परिसरातील अवैध धंदे करणाऱ्या माफियांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कासा व तलासरी पोलीस ठाण्यात ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. त्यांच्यावरही कारवाई करून गुन्हे दाखल केले करून कडक कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर कोणी अवैध धंदे करत असतील, तर त्यांच्यावर अशीच पुढेही कठोर कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्य जनतेने न घाबरता कधीही माझ्या मोबाइलवर फोन करून आपल्या भागांतील अनधिकृत कार्याची माहिती द्यावी. त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. – प्रदीप कसबे, पोलीस निरीक्षक, मनोर पोलीस ठाणे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -