नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील पाथरज गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या वरच्या भागातील तलावात एक म्हैस मृत झाली आहे. त्या म्हशीच्या शरीराचे अवयव कुजले असल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा दूषित झाला आहे. दरम्यान, या दूषित पाण्याने ग्रामस्थांना साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्जत पाथरज ग्रामपंचायत मधील ८० ते ८५ घरांची लोकवस्ती असलेल्या पाथरज गावाला दोन ते तीन दिवस दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ग्रामस्थांनी गावात ज्या विहिरींमधून पाणी येते त्या विहिरींची जाऊन पाहणी केली असता त्या विहिरींच्या वरच्या भागात असलेल्या तळ्यात म्हैस मरून पडलेली दिसून आली. अनके दिवस ती म्हैस त्या विहिरीत पडलेली असल्याने मृत अवस्थेतील ती म्हैस सडून गेली होती. त्या तळ्यातील पाणी पाझरून विहिरीत येते व तेच पाणी पाथरज गावातील टाकीत साठवले जाते आणि ते सर्व पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. पाथरज गावासाठी आठ वर्षापूर्वी गाव तलाव – विहिर जिल्हा परिषद फंडातून बांधण्यात आली होती. त्याच विहिरीजवळ तळे आहे. त्या तलावात २० दिवसापूर्वी म्हैस मरून पडली होती.
दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने काही ग्रामस्थ अजारी सुद्धा पडले आहेत. ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे यासाठी ती विहिर काही ग्रामस्थांच्या मदतीने साफ करून त्यामधील पाणी बाहेर काढून फेकले आहे. मात्र तरीदेखील ग्रामस्थ यांच्या मनात दूषित पाणी पिल्याने साथीचे रोगांना निमंत्रण द्यावे लागू शकते अशी भीती निर्माण झाली आहे.