कोल्लम : केरळ राज्यात ‘टोमॅटो फ्लू’ नावाच्या दुर्मिळ विषाणूजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचा ८० पेक्षा जास्त मुलांना संसर्ग झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे सर्व प्रकरणे पाच वर्षांखालील मुलांची आहेत आणि त्यांची नोंद स्थानिक सरकारी रुग्णालयांतून झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये आधीच ‘टोमॅटो फ्लू’ किंवा ‘टोमॅटो फिव्हर’ची ८२ घटनांची नोंद झाली आणि ही संख्या वाढण्याचा अंदाज आहे.
टोमॅटो फ्लू हा भारतातील एक सामान्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग आहे. ज्यामध्ये पाच वर्षाखालील कमी वयाच्या मुलांना ताप येतो, सहसा पुरळ उठणे, त्वचेची जळजळ होते. या फ्लूमुळे संक्रमित मुलांच्या शरीराच्या अनेक भागांवर फोड येतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणून याला “टोमॅटो फ्लू” किंवा “टोमॅटो फीवर” म्हणतात. सध्या, संसर्ग फक्त केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील काही भागांमध्ये नोंदवला आहे. परंतु आरोग्य अधिकार्यांनी ईशारा दिला आहे की प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास, संसर्ग इतर भागातही पसरू शकतो.
या संदर्भात वैद्यकीय पथकाकडुन टोमॅटो फ्लूची लक्षणे तपासली जात आहेत. तसेच, अंगणवाड्यांमधील पाच वर्षांखालील मुलांची तपासणी करण्यासाठी २४ सदस्यांची टीम तयार करण्यात आली आहे.