Sunday, July 21, 2024
Homeकोकणरायगडचांधई तहानली, पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामस्थांचे हाल कुपनलिका, विहिरींचे पाणी आटले

चांधई तहानली, पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामस्थांचे हाल कुपनलिका, विहिरींचे पाणी आटले

अधिकारी वर्गानेही फिरवली पाठ...

कर्जत (प्रतिनिधी) : मे महिना म्हटला की सर्व ठिकाणी पाण्यासाठी भटकंती पहायला मिळते. कर्जत सारख्या आदिवासी बहुल क्षेत्रात अनेक वाड्या, वस्त्या ह्या पाण्याच्या दुर्भिक्षमुळे काही किलोमीटर पाण्यासाठी वणवण करतात. कर्जत मधील चांधई ह्या गावी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत आणि त्यात महत्वाची गोष्ट अशी की ह्या दुर्भिक्षाकडे आजतागायत कुठल्याही अधिकारी वर्गाने ढुंकूनही बघितले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चांधई गाव हे निसर्ग सौंदर्याने नटलेले अतिशय समृद्ध गाव आहे. सर्व बाजूंनी वेढलेल्या फार्म हाऊस मुळे गावाचा पर्यटन विकास होत आहे. परंतु असे असताना ह्या गावात आजतागायत पाणी पोहचले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ कुपनलिका आणि विहिरींवर अवलंबून आहेत. गावाच्या पश्चिमेला उल्हास नदी तर ईशान्येला पेज नदीचा बारमाही अथांग पसरलेला परिसर आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात येणाऱ्या राजनाल्याच्या पाण्याचा देखील ह्या गावाला फायदा होत असतो. परंतु ह्या वर्षी रब्बी हंगामात लागवड करण्याला शेतकऱ्यांनी नापसंती दर्शविल्याने पाण्याचे वितरण सगळीकडे झाले नाही. उल्हास नदीच्या पात्रात असलेल्या जलपर्णी मुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही.

तसेच नदी पात्रात चालू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे पाण्यात मातीचे कण आलेले आहेत त्यामुळे हे पाणी एक जागी साठलेले असल्याने खराब झाले आहे. गावात चालू असलेल्या दोन पाणी योजना ह्या अर्धवट अवस्थेत असल्याने गावातील लोकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गावात अनेक शेतकऱ्यांकडे असलेल्या गुरांसाठी पाणी आणि खाद्यान्न मिळत नसल्याने गावातील शेतकरी वर्गाने अत्यंत कमी भावात आपली जनावरे इतर व्यापारी वर्गाला विकली असल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील लोकांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा अतोनात त्रास सहन करावा लागत असताना कुठल्याही अधिकारी वर्गाने गावात येऊन साधी चौकशी केली नसल्याने गावातील ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत.

चांधई गावात पाण्याची कमतरता एवढी कधीच जाणवली नव्हती परंतु ह्या वर्षी काही शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिक ह्यांच्या आडमुठे धोरणामुळे राजनाल्याचे पाणी गावात आले नाही. त्यामुळे आज गावात पाण्याची टंचाई आहे. – माधव कोळंबे. (ग्रामस्थ, चांधई)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -