मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालच्या उपसागरात ‘असानी’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ पश्चिम, मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरात निर्माण झाले असून पश्चिम वायव्य दिशेने ते सरकले आहे. मात्र या चक्रीवादळचा मुंबईवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
तर पुढे हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेला वळून ओडिशाच्या किनाऱ्यापासून वायव्य बंगालच्या उपसागराकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पुढील ४८ तासांत ते हळूहळू कमकुवत होऊन वादळात बदलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे चक्रीवादळ हे मुंबई समुद्र किनाऱ्यापासून बरेच दूर आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता ही कमी असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील कमाल तापमान स्थिर आहे. सोमवारी कुलाबा ३३.५, सांताक्रूझ ३५.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील पाच दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. सध्या हवेचा वेग मंदावला असून समुद्राकडून वाहणारे वारे उष्ण आहेत. त्यामुळे हवेत आर्द्रता जाणवत आहे असे ही नायर पुढे म्हणाल्या आहेत.