
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली. दहिसर ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला. यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कामावर निघालेल्या चारकमान्यांचा खोळंबा झाला. मुंबईकरांना रेल्वेच्या झालेल्या या समस्येमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच वाजता दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यानंतर प्रवाशांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. काही वेळातच लोकल सेवा सुरळीत देखील झाली, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले.
दरम्यान, लोकल वाहतूकीवर परिणाम झाल्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना ऑफिसला जायला उशिर होऊन लेटमार्क लागला.