बोईसर (वार्ताहर) : पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी संबंधित अधिकारी वर्गाना दिले. मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, आयुषि सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम उपस्थित होते.
डॉ. गुरसळ म्हणाले, पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात धान्यपुरवठा करताना या गावांना तीन महिन्यांचे धान्य उपलब्ध करुन द्यावे, जलसंधारण विभागाच्या प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री करावी, विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी, वसई-विरार मनपा, नगर षरिषद आणि नगरपंचायतींनी शहरी भागातील नालेसफाई २० मे पूर्वी करावी यामुळे शहरी भागातील वस्तीत पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचणार नाही.
शहरी भागातील धोकादायक इमारती व झाडांची पाहणी करुन अतिजीर्ण इमारतींवर योग्य ती कार्यवाही करावी. पाटबंधारे व जलसंपदा विभागाने आपल्या प्रकल्पावर बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करुन सूचनाफलक लावावे तसेच अतिवृष्टीच्या दिवसात दर ३ तासांनी पाणीपातळीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गुरसळ यांनी दिल्या.
गुरसळ पुढे म्हणाले, ज्या गावांना व शहरातील वार्डाना अतिवृष्टीचा धोका आहे, वसई मिठागरातील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी व्यवस्था करावी तसेच समुद्राच्या भरतीवेळी समुद्रकिनाऱ्यावर लाईफ गार्डची व्यवस्था करावी. गावपातळीवर उपाययोजना करण्याचे काम गटविकास अधिकारी यांनी करावे. गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
मान्सूनपूर्व तयारीची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सूर्या, मोडकसागर, मध्य वैतरणा आणि तानसा धरणातून नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या वेढ्यामुळे पालघर, डहाणू, विक्रमगड आणि वसई तालुक्यातील काही गावात बचावकार्य राबवावे लागते. तसेच समुद्राला आलेल्या भरतीमुळे शहराच्या ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून शोध व बचाव पथकासाठी तालुकानिहाय उपलब्ध असलेल्या साहित्याची माहिती यावेळी महाजन यांनी दिली.
बैठकीला उपायुक्त वसई विरार मनपा शंकर खंदारे, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट बी. के. सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक एस. बोदादे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी दिलीप नेरकर, मोटार वाहन निरिक्षक उज्वला देसाई, कार्यकारी अभियंता एम. सी. रमेश जोहरे, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य न. देवराज, कार्यकारी अभियंता पालघर युवराज जरग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कॅप्टन प्रवीण खरात, जिल्हा नियोजन अधिकारी सचिन माघाडे, पोलीस उपायुक्त वसई विरार संजय पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सागर पाटील, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, धनाजी तोरस्कर, बी. आगे पाटील, कार्यकारी अभियंता पाटबंधारे रवी पवार, उप अभियंता भारत संचार निगम लि. संदीप मसुरकर, मुख्याधिकारी प्रताप कोळी, ऋषिकेश पाटील, वैभव आवारे यांची उपस्थिती होती.