विलास खानोलकर
अक्कलकोटपासून तीन कोसांवर मैदरगी म्हणून गाव आहे. त्या गावी पांडू सोनार या नावाचा एक गृहस्थ असून तो महाराजांचा भक्त होता. कर्जाचे ओझे डोक्यावर झाल्याकारणाने कर्जदारी त्याला चैन पडू देत नसत. एका श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घडविण्यास दिले. त्याने रूप्याचे दागिने करून सोन्याचा वर मुलामा दिला व ते मालकास दिले. तो स्वामींचा भक्त होता खरा; परंतु आजचे मरण उद्या या म्हणीप्रमाणे त्याने विचार केला. काही दिवसांनी ते त्यांचे कर्म मालकास उमगले व त्याने मामलेदाराकडे फिर्याद केली. तात्यासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा शाबीत केला. दुष्काळाचे दिवस असल्याने होईल तोपर्यंत कैदेची शिक्षा न देता फटक्यांची द्यावी, असा त्या वेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्यांची शिक्षा दिली.
पांडूने आलेले संकट जाणून श्रीस्वामी समर्थांचा धावा केला व पश्चातापपूर्वक पुन्हा असे कर्म करणार नाही, म्हणून पांडूने शपथ घेतली. भक्तकामकल्पतरू स्वामी समर्थ भक्त संकटात पाहून कळवळले. श्रीकृष्ण भगवान यांनी वस्त्रहरणाचे वेळी धावत जाऊन द्रौपदीची, आपल्या प्रिय भगिनीची लज्जारक्षण केली, त्याचप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्तांचा सांभाळ केला. ज्या दिवशी शिक्षा अमलात यावयाची होती, त्या दिवशी पांडू सोनार यांने महाराजांची स्तुती करून फारच आळवले.
समर्थांची स्वारी अक्कलकोटास होती. सकाळची स्नानाची वेळ होती. स्नान करावयाचे नाही, मेणा लवकर लाव म्हणून महाराज म्हणाले, मग काय उशीर! सत्वर स्वारीची तयारी होऊन महाराज बाहेरगावी जाण्यास निघाले. महाराज निघाले ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैदरगीचे मार्गास लागले. मैदरगीस पोहोचेपावेतो तीन वाजून गेले. धर्मशाळेत वगैरे दुसरे ठिकाणी न जाता थेट कचेरीत गेले. महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला, असे समजून मामलेदार यांनी आदरसत्कार करून श्रीस आपल्या गादीवर बसवून आपण हात जोडून पुढे उभे राहिले. कैदी सोनार समोरच उभा होता. ये रे इकडे, असे म्हणून त्यास जवळ बोलावून महाराजांनी बसण्यास सांगितले. कैद्यावरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदार यांस आश्चर्य वाटले. सरबराईस मामलेदार लागले. थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनारास, हं सरबराईस जा, बसलास का? म्हणून आज्ञा केली. सोनारास तेच पाहिजे होते. आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्यांने लावली. दुसरे दिवसापावेतो पांडू सोनारास आपणांजवळ ठेवून घेतले. पांडूवरील महाराजांचे प्रेम पाहून मामलेदाराने त्यास शिक्षा न करता, सोडून दिले. मोठ्या हर्षाने सोनाराने आपली साद्यंत गोष्ट सेवेकरी यांस सांगितली. महाराज स्नान करता करता एकदम उठून का आले, याचे कारण सेवेकरी याचे ध्यानात येऊन, सर्वांनी स्वामीनामाचा जयजयकार केला.
संदेश : संकट येता खरे | स्वामी धावती सत्वरे ||