Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीरिझर्व बँकेच्या रेपो दरानंतर शेअर बाजारात मोठी घसरण

रिझर्व बँकेच्या रेपो दरानंतर शेअर बाजारात मोठी घसरण

डॉ. सर्वेश सुहास सोमण

या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण पहावयास मिळाली. सत्राच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवारी निर्देशांकात वाढ दिसून आली त्यानंतर मात्र सलग ४ ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात घसरण झाली. मागील शुक्रवारी शेअर बाजारात शेवटच्या काही मिनिटांमध्ये निर्देशांकात फार मोठ्या प्रमाणात नफा वसुली पहावयास मिळाली होती आणि त्यामुळे आपण आपल्या मागील २ मे २०२२च्या लेखातच शेअर बाजार शुक्रवारी शेवटच्या काही मिनिटांत झालेल्या घसरणीनंतर पुढील आठवड्यासाठी देखील नकारात्मक संकेत देत आहे, असे सांगितलेले होते. त्याचप्रमाणे अल्पमुदतीसाठी निर्देशांक करेक्शन अर्थात मोठ्या मंदीचे संकेत देत आहेत. चार्ट देत असलेले संकेत पाहता येणारा आठवडा हा अत्यंत महत्त्वाचा आहे, हेदेखील सांगितलेले होते. निफ्टीची १६८०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जर ही पातळी तुटली, तर निर्देशांकात ४०० ते ५०० अंकांची मोठी घसरण होईल हेदेखील सांगितलेले होते.

नेहमीप्रमाणेच तांत्रिक विश्लेषणानुसार केलेले आपले सगळे साप्ताहिक अंदाज योग्य ठरत आपण सांगितल्यानुसारच निर्देशांकात हालचाल झाली. निफ्टीने १६८०० ही पातळी तोडत १६३४० हा निच्चांक नोंदविलेला आहे. संपूर्ण आठवड्याकडे पाहिल्यास सेन्सेक्स २२२५ अंकांनी बँकनिफ्टी १५०० अंकांनी आणि निफ्टी ६९१ अंकांनी कोसळलेले आहेत. मागील २ मे २०२२च्या लेखात आपण “कॅनफिन होम्स” या शेअरने अल्पमुदतीच्या चार्टनुसार ६११ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत मंदी सांगणारी रचना तयार केलेली असून ५९२ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात आणखी घसरण होणे अपेक्षित आहे त्यामुळे पुढील काळात या शेअरमध्ये मंदीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल, असे सांगितलेले होते. या आठवड्यात “कॅनफिन होम्स” या शेअरमध्ये मोठी घसरण पहावयास मिळाली. “कॅनफिन होम्स” या शेअरमध्ये केवळ एका आठवड्यात ५१८.५० रुपये किंमतीपर्यंत घसरण झालेली आहे. टक्केवारीत पाहायचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर जवळपास १२ ते १३ टक्क्यांची घसरण या शेअरमध्ये झालेली आहे. या आठवड्यात जागतिक शेअर बाजारातदेखील मोठी घसरण झाली. यामध्ये मुख्य कारणं होते ते म्हणजे वाढती महागाई. फेड रिझर्व या जागतिक बँकेने व्याजदरात अर्धा टक्क्यांनी वाढ केली आणि त्यात पुढील काळात आणखी वाढीचे संकेत दिले. परिणामी अमेरिकेतील भांडवली बाजाराच्या नॅसडॅक निर्देशांकात गुरुवारच्या सत्रात ५ टक्क्यांची विक्रमी घसरण झाली. मागील २ वर्षांत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

भारताच्या रिझर्व बँकेने देखील नियोजित वेळेआधीच तातडीने बैठक घेत रेपो दरात ४० आधार बिंदूंची वाढ केली. बँक ऑफ इंग्लंडनेदेखील या आठवड्यात व्याजदरात थेट १ टक्क्याची वाढ केलेली आहे. पतधोरण समजण्यासाठी त्यातील काही गोष्टींचे अर्थ समजणे आवश्यक आहे. पतधोरणात अनेक महत्त्वाचे घटक असतात, त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रेपो दर. रिझर्व बँक बँकाना जे कर्ज देते आणि त्या दिलेल्या कर्जावर जे व्याजदर लावले जातात, त्याला “रेपो दर” असे म्हणतात. त्याचप्रमाणे बँका या रिझर्व बँकेकडे ज्या ठेवी ठेवतात, त्या ठेवलेल्या ठेवींवर बँकांना जो परतावा मिळतो, त्याला “रिव्हर्स रेपो दर” असे म्हणतात.

सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा मंदीची असून तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसिस) मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार स्टार, नोकरी, ग्लेनमार्क फार्मा कल्पतरू पॉवर, टाटा कम्युनिकेशन या शेअर्सची दिशा अल्पमुदतीसाठी मंदीची झालेली आहे. कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७७०० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते. अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५०००० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. निर्देशांकानी मोठ्या मंदीचे संकेत दिलेले असल्यामुळे पुढील काळात शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच व्यवहार करावेत. पुढील काळात निर्देशांकात होणाऱ्या घसरणीत दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. या आठवड्यात बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रांतील आघाडीच्या लार्सन अँड टुब्रोने शुक्रवारी एल अँड टी इन्फोटेक अर्थात एलटीआय आणि माइंड ट्री या दोन दिग्गज कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. याबद्दल आणखी सविस्तर पुढील लेखात बोलूया.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -