- आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण
- डोंगर चढून विहिरीतून आणावे लागते पाणी
- फक्त ४ टँकरने दिवसाआड पाणीपुरवठा
जव्हार (प्रतिनिधी) : जव्हार तालुक्यातील ८ ते १० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो; परंतु टँकरसुद्धा वेळेवर येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही. जव्हार तालुका हा डोंगराळ भाग असून, येथे पावसाळ्यात जास्त पाऊस पडूनसुद्धा इथे जलसंधारण विभाग, वनविभाग, कृषी विभागामार्फत पाणी अडवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने पावसाळ्यात पडलेले सर्व पाणी डोंगरातून वाहून खाली झिरपून जाते.
त्यामुळे इथे फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पंचायत समिती जव्हार पाणीपुरवठा विभागाकडून तालुक्यासाठी अवघे ४ टँकर लावले आहेत. या टँकरने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात कधी टँकरचा बिघाड किंवा पंक्चर झाल्यास दोन-तीन दिवस गावात पाणी पोहोचत नाही.
केंद्र व राज्य सरकारमार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जलजीवन मिशनमध्ये अनेक गाव समविष्ट करून ग्रामीण भागातील कुटुंबांना २०२४ पर्यंत “हर घर नल से जल” प्रमाणे प्रत्येक घरात नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिनप्रमाणे पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने ४ सप्टेंबर २०१० रोजी निर्णय जारी केला आहे.
या योजनेची ग्रामपंचायत व स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने योग्य नियोजन करून गावचा आराखडा तयार केल्यास व त्याची योग्य अंमलबजावणी केली, तर संपूर्ण जव्हार तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होऊ शकते. सध्या जव्हार तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी विहिरीवर बसून टँकरची वाट पाहावी लागत आहे. टँकर वेळेत आला नाही, तर महिला डोंगर चढून ५ किमी अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणतात. काही गावांमध्ये रात्रीपर्यंत विहिरीवर बसून पाणी भरतात.
तालुक्यातील खरंबा, काळीधोंड, कासटवाडी, दादारकोपरा, सागपणा, रिठिपाडा, शिवेचापाडा या गावांमध्ये पाणीटंचाई आहे. या गावांना दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. गावातील नदीनाले, तलाव सुकल्याने गावातील गुरा-ढोरांच्या पिण्याचा पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. शासनाने लक्ष घालून पाणीटंचाई दूर करण्याची ग्रामस्थांची
मागणी आहे.
आमच्या गावात भीषण पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांनी पंचायत समितीमार्फत टँकरची मागणी केली आहे. गावात टँकर येतो. परंतु तो कधी येतो तर कधी येत नाही. त्यामुळे महिलांना गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या विहिरीवर जाऊन डोक्यावर हंडा घेऊन, डोंगर चढून पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यामुळे गावात ग्रामपंचायतमार्फत जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्यासाठी योग्य नियोजन करून पाण्याचा प्रश्न कायमचा दूर होईल, अशी योजना तयार करावी. महिलांची पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण कायमची थांबवली गेली पाहिजे. – संतोष मोकाशी, ग्रामस्थ कासटवाडी