अलिबाग (प्रतिनिधी) : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे शाळेची इमारत जमीनदोस्त झाल्याने कधी मंदिरात, तर कधी माळरानावर वडाच्या झाडाखाली शाळा भरू लागली होती. शिकण्याची, शिकवण्याची जिद्द होती. पण शाळेला इमारत नव्हती. त्यामुळे सर्वांचीच मोठी गैरसोय होत होती. प्रसारमाध्यमांवरील शाळेबाबतच्या बातम्या पाहून रोहा एमआयडीसीतील ‘डीआरटी अॅथिया कंपनी’ धावून आली आणि अवघ्या ७ महिन्यांत विद्यार्थ्यांना नवीन अद्ययावत अशी शाळेची नवीन इमारत मिळाली.
चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले होते. रोहा तालुक्याच्या दुर्गम डोंगराळ भागातील चिंचवली, अतोणे या आदिवासी वाडीवरील शाळा तर पुरती जमीनदोस्त झाली. पण आता ही नवीन इमारत मिळाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. या नवीन इमारतीचे उद्घाटन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अॅन्थिया ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विन्सेन्ट पॉल, संचालक डॉ. पॉल विन्सेन्ट मेनाचरी, मॅथ्यू मेनाचरी, रोहा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विनोद पाशिलकर, शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भाषण सुनील तटकरे यांनी अॅन्थिया गृपने शाळेची इमारत बांधण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. जिल्हा परिषदेची अशी शाळा आपण प्रथमच पहात आहोत. हे एक आगळेवेगळे उदाहरण ठरेल. सरकारी कामे कधी वेळेवर होत नाहीत. मात्र कंपनीने अवघ्या सहा-सात महिन्यांत अद्ययावत अशी इमारत उभी केली. या शाळेच्या इमारतीप्रमाणे याच शाळेतून उच्चशिक्षित विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्याध्यापक गजानन जाधव यांनी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी दाखवलेला पुढाकार आणि मेहनत निश्चितच कौतुकास्पद ठरत असल्याचे तटकरे म्हणाले.
हो तयाचा सोबती…
शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव यांनी लिहिलेल्या ‘हो तयाचा सोबती’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात जाधव गुरूजी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला आहे. आपल्या भाषणात तटकरे यांनी या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला.
शाळेची इमारत पडल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांची होणारी गैरसोय आम्ही माध्यमांमध्ये पाहिली, वाचली. आमच्या टीमने इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. परीस्थिती अतिशय गंभीर होती. त्यानंतर कंपनीने नवीन इमारत बांधण्यासाठी पुढाकार घेतला. आणि अवघ्या ७ महिन्यांत अद्ययावत आणि सर्व शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी शाळा उभी राहिली. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी खऱ्या अर्थाने काहीतरी केल्याचे समाधान वाटते.
– मनिषा गोळे, व्यवस्थापक एचआर डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स
आनंद गगनात मावेना…
शाळेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी विद्यार्थी उत्साही दिसत होते. शाळेची नवीन इमारत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. निसर्ग चक्रीवादळात शाळा जमीनदोस्त झाल्यानंतर कधी मंदिरात, तर कधी वडाच्या झाडाखाली शाळा भरत होती. शिकताना अडचणी येत होत्या. पण आता कंपनीने आम्हाला शाळा बांधून दिली. खूप आनंद होतोय. आम्ही आता खूप शिकू, शाळेचे नाव मोठे करू, असे महेश पवार या विद्यार्थ्याने सांगितले.