अनिल खेडेकर
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील चेणा गाव येथील ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये येत असलेल्या ९६ झाडांची कत्तल करण्याच्या प्रस्तावाला पर्यावरण प्रेमी जनता, अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे. सेना आमदारांच्या प्रकल्पाला बाधित ठरणाऱ्या या झाडांच्या कत्तली विरोधात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच असलेल्या निसर्गरम्य परिसरातील चेणा गावातील सर्व्हे क्र. ९७, ९८ मध्ये एक बांधकाम प्रकल्प सुरू आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये असलेल्या या प्रकल्पाला बाधा ठरणाऱ्या ९६ झाडांची कापणी करण्याची अनिस अँड असोसिएट यांनी परवानगी मागितली आहे. त्या आनुषंगाने पालिकेने जुनी व मोठमोठी ९६ झाडे कापण्यासाठी २८ एप्रिल रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. या जागेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा प्रकल्प सुरू होणार आहे. येथे माती उत्खननासाठी परवानगी घेतली; परंतु त्या जागेत उत्खनन न करता मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात आला आहे. तसेच झाडे कापण्यासाठी परवानगी मिळण्यापूर्वीच अनेक झाडे कापण्यात आली आहेत, असा तलाठींनी तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे. सदर प्रकल्पाचे काम पूर्णपणे नियमबाह्य असून याला दिलेली बांधकाम परवानगी चुकीची असून ही जागा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आहे. यामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे.
या जागेत जवळपास २०० झाडे असल्याचे सॅटेलाइट नकाशामध्ये दिसत आहे. तरीही महापालिकेने कमी झाडे असल्याचे सांगत परवानगी देण्यासाठी नोटीस काढली आहे. याला शहरातील अनेक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. होप फाऊंडेशनचे नरेश जैन यांनी या विरोधात रविवारी मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळ स्वाक्षरी अभियानाचे आयोजन केले आहे, तर चेणा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भिकाजी जाधव यांनी यापूर्वी सुद्धा अशीच वृक्षतोड आणि माती भराव झाल्याचे सांगून तक्रार करूनही महापालिका प्रभाग अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याचे सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हरेश सुतार आणि सचिन पोपळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत भारत राजपत्रात ५ डिसेंबर २०१६ मध्ये जाहीर झालेल्या पर्यावरण, वन आणि जलवायू मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनाचा संदर्भ देत इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये झाडे तोडणे तथा स्थलांतरित करण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करून सदर बांधकाम प्रस्तावसुद्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर बहुजन विकास आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष नीलेश साहू यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असून मीरा-भाईंदर शहर सुंदर व सदा हरितच राहू द्या, अशी विनंती करून वृक्षतोडीची नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे.
झाडे कापण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. नागरिकांच्या तक्रारीचा विचार करून तसेच सर्व नियमांचे पालन करून अंतिम निर्णय घेतला जाईल. – दिलीप ढोले, आयुक्त