
मुंबई : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील सुमारे २९ ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापे टाकले. ही ठिकाणे दाऊदशी संबंधित शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी जोडलेली आहेत. यामध्ये नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार या ठिकाणांचा समावेश आहे.
सदर कारवाईबाबत एनआयने सांगितले की, दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या घरांवर अनेक ठिकाणी एनआयएचे छापे सुरू आहेत. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर दाऊदच्या संपर्कात होते आणि तपास संस्थेने फेब्रुवारीपासूनच या संदर्भात कारवाई सुरू केली आहे.
अधिक माहिती अशी की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये एनआयएने दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी आणि भारतात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने डी-कंपनीचे शीर्ष नेतृत्व आणि ऑपरेटर यांच्या सहभागाशी संबंधित गुन्हा दाखल केला होता. भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, जावेद चिकना, इकबाल मिर्ची आणि इतर लोकांसोबत दाऊदने आपले नेटवर्क उभे केले होते. हे लोक व्यावसायिकांना टार्गेट करायचे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती यापूर्वी आम्हाला मिळाली होती. त्यावरुनच कारवाई करण्यात आली आहे.