Friday, July 19, 2024
Homeक्रीडाविजयी हॅटट्रिकसाठी मुंबईचा संघ उत्सुक

विजयी हॅटट्रिकसाठी मुंबईचा संघ उत्सुक

कोलकाताविरुद्ध इंडियन्सचा पगडा भारी

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर असलेल्या व टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना सोमवारी संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. सलग आठ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत सलग दोन सामने जिंकले आहेत. गत सामन्यात टेबल टॉपर्स गुजरातला पराभूत केल्यामुळे उत्साही मुंबई इंडियन्स सलग तिसरा विजय नोंदवण्याच्या तयारीतच मैदानात उतरतील.

दोन्ही संघांची आयपीएलमधील आतापर्यंतची एकमेकांविरुद्धची कामगिरी पाहता कोलकातापेक्षा मुंबई इंडियन्सचा पगडा भारी असल्याचे दिसते. या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मुंबईने २२ आणि केकेआरने आठ सामने जिंकले आहेत. हा विक्रम आणखी सुधारण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. अशा स्थितीत केकेआरला त्याच्याविरुद्ध सावध राहावे लागेल. मुंबईच्या संघाचा आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध चांगला रेकॉर्ड पाहता कोलकाताला इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या अंधुक आशा जिवंत ठेवायच्या असतील, तर त्यांना सांघिक कामगिरी करून विजय मिळवावा लागेल. पॉइंट टेबलमध्ये मुंबई शेवटच्या स्थानावर आहे. संघ क्रमवारीच्या सलामीच्या स्थानी अनेक प्रयोग करून पाहणे आणि संघात वारंवार बदल करणे केकेआरला या हंगामात महागात पडले आहे.

दुसरीकडे, गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सचा ५ धावांनी पराभव केला. या विजयामुळे मुंबईच्या संघाचे मनोबल वाढले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचे १० सामन्यांत चार गुण आहेत. ते जास्तीत जास्त १२ गुणांपर्यंत पोहोचू शकतात; जे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नाहीत. राजस्थान व बंगळूरु १४ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या, तर लखनऊ व गुजरात १६ गुणांसह पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. कोलकाताचे ८ गुण असून उरलेल्या तीन सामन्यांमध्ये जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. पण तरीही त्यांचे चौथे स्थान पक्के नाही. त्यामुळे केकेआर जवळपास स्पर्धेबाहेर आहेत. लखनऊकडून झालेल्या पराभवामुळे त्यांच्या प्लेऑफच्या अडचणी वाढल्या; परंतु एक विजय त्यांच्या अंधुक आशा पुनर्जीवित करू शकतो.

प्रतिकूल परिस्थिती असतानाही दोन्ही संघ एकमेकांना कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघ आता त्यांच्या यंदाच्या हंगामाचा शेवट सकारात्मक व गोड करण्याच्या प्रयत्नात आहेत.

रोहित आणि इशान फॉर्ममध्ये

मुंबईसाठी चांगली गोष्ट म्हणजे कर्णधार रोहित आणि इशान किशन या दोन्ही सलामीवीरांनी टायटन्सविरुद्ध संघाला चांगली सुरुवात करून दिली. केकेआरविरुद्ध तो आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतील. रोहित मुंबईसाठी आयपीएलमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यापासून ८८ धावा दूर आहे आणि सोमवारी तो या टप्प्यावर पोहोचू शकतो. मुंबईचे फलंदाज रोहित, किशन आणि सूर्यकुमार यादव हे पॉवरप्लेचा चांगला वापर करण्यात पटाईत आहेत. दुसरीकडे, केकेआर पहिल्या सहा षटकांत धावा काढण्यासाठी धडपडत असून, त्यांचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम हे यालाच त्यांच्या या हंगामातील पराभवाचे कारण मानतात.

ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम; वेळ : रात्री ७.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -