Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेआंब्याचे दर घसरले...

आंब्याचे दर घसरले…

खरेदीसाठी ग्राहकांची वाशी मार्केटला झुंबड

अतुल जाधव

ठाणे : सध्या नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंबे घेण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांची गर्दी होत आहे. एक हजार, आठशे रुपये डझन मिळणारा हापूस आंबा दोनशे, चारशे रुपये डझन भावाने मिळत असल्याने आंबा खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे. मात्र आंब्याच्या दरात असलेली घसरण पाहून आंबा उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ग्राहकांच्या बजेटमध्ये आंबा मिळत असल्याने ग्राहक राजा मात्र सुखावला आहे.

कोकणातील हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र आवक कमी असल्याने आंब्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. एपीएमसी मार्केटमध्ये ९० हजारपेक्षा जास्त हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाल्याने भाव कोसळले आहेत. जवळपास एक हजार रुपये डझन मिळणारा आंबा आता २०० ते ५०० रुपयांवर आला आहे.

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागली आहे. दिवसाला जवळपास ९० हजार पेट्यांची आवक होऊ लागल्याने हापूस आंब्यांचे दर निम्म्यावर आले आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा येऊ लागला आहे. अवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्यावर परिणाम झाल्याने आवक घटली होती. त्यामुळे डझनाला हापूस आंब्याचे भाव एक हजारांच्या वर गेले होते. मात्र आता तेच भाव २०० ते ५०० रुपये डझनावर आले आहेत. हापूस आंब्याबरोबर पायरी, केसर, बदामी, लालबाग, मलिका या आंब्यांचीही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून आवक झाली आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये आंबा स्वस्त झाल्याने किरकोळ व्यापाऱ्यांबरोबर सर्वसामान्य ग्राहकांनीही गर्दी केली आहे. हापूस आंब्याबरोबर इतर जातींच्या आंब्यांचे दरही निम्म्यावर आले आहेत. त्यातच हापूस आंब्याचा सीझन पुढील १५ दिवसच चालणार असल्याने खवय्यांची पावले नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटकडे वळत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -