लखनऊ (वृत्तसंस्था) : ताजमहाल म्हणजे प्राचीन शिवमंदिर आहे. याची पडताळणी करण्यासाठी ताजमहालचे बंद असलेले २२ दरवाजे उघडे करावे या मागणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालवरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हिंदू देवतांच्या मूर्तींची उपस्थिती तपासण्यासाठी ताजमहालमधील २२ बंद दरवाजे उघडावेत. दरवाजे उघडून त्याची तपासणी करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला निर्देश देण्यात यावेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांनी हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याच्या दाव्यांचाही उल्लेख केला आहे. तथ्य शोध समितीची स्थापना आणि भारतीय पुरत्त्त्व सर्वेक्षणकडून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अनेक इतिहासकार याला मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल मानतात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, तेजो महालय हाच एक ताजमहाल आहे. ज्योतिर्लिंग म्हणजेच त्यात उत्कृष्ट शिवमंदिर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. “हे आदरपूर्वक सादर केले जाते की, चार मजली इमारतीच्या वरच्या आणि खालच्या भागात (अंदाजे २२ खोल्या) काही खोल्या आहेत. ज्या कायमस्वरूपी बंद आहेत आणि पी. एन. ओक यांच्यासारख्या अनेक इतिहासकार आणि करोडो हिंदू उपासकांचा असा ठाम विश्वास आहे की, त्यामागे मंदिर आहे. भगवान शिव तेथे उपस्थित आहेत,” असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.