नागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महाकाली नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. यामध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सध्या अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाकाली नगर झोपडपट्टीत आज सकाळच्या सुमारास ही आग लागली. याठिकाणी बघ्यांची तुफान गर्दी असून अग्नीशमन दल आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक घरं देखील आगीत जळून खाक झाले आहेत. या झोपडपट्टीत जवळपास १६ वेळा मोठे आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण, आग नेमकी कशामुळे लागली? याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
नागपुरात तापमानाचा पारा ४५ अंशावर आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आरबीआय चौकात चालत्या सिटी बसला आग लागली होती. यामधून प्रवास करत असलेल्या ३० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला होता. त्यापूर्वी देखील काही वाहनं जळून खाली झाली होती. या कडाक्याच्या उन्हात झोपडपट्टीत लागलेली आग विझविण्याचं आव्हान अग्नीशमन दलासमोर आहे.