बोईसर (वार्ताहर) : बंगालच्या उपसागरात येत्या काही दिवसांनी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याचा अंदाज भारतील हवामान खात्याने वर्तवला आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या १९ तारखेपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि वीट उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे.
मान्सूनपूर्व पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वादळ काळात मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई केली आहे. चालू हंगामात दुबार भातशेतीची कापणी तर भुईमुग, भाजीपाला, आंबा आणि काजूची काढणी शिल्लक आहे. वादळी वारे, पावसामुळे तयार पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या मध्यात आलेल्या तोक्ते वादळामुळे जिल्ह्यातील दुबार भातशेती, आंबा,काजू, जांभूळ शेती आणि वीट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या छताचे पत्रे उडाले होते, तर घरांवर झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले होते. काही घरे कोसळली होती. वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
कापणीसाठी तयार झालेल्या उन्हाळी भातापिकाच्या शेतातील पाण्याचा निचरा करुन भाताची कापणी करून मेच्या १५ तारखेपूर्वी काढणी करावी. त्यानंतरच्या दोन दिवसांत वाळवणी व झोडणी करुन भाताची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, मे नंतर तयार होणाऱ्या भातपिकावर उचित किडरोग व्यवस्थापन करावे, पावसात भिजून भाताचा पेंढा वाया जाऊ नये यासाठी पेंढ्याची (पावल्या) सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घेऊन शेंगा काढाव्या. काढलेल्या शेंगा पाच दिवस उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्या, मच्छीमारांनी मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.