
- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे प्रतिपादन
- जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाचे शानदार उद्घाटन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : ‘छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे दैवत असून दोघांनीही मानवतेचा संदेश दिला आहे. आज आपण माणूस म्हणून जगू शकतो, याचे सारे श्रेय छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. या महान नेत्यांच्या आदर्शांवर स्वतःला सिद्ध करा. समाजात सध्या आग लावणाऱ्या अनेक विकृती फोफावत असताना आपण मात्र आग लावणारे नाही, तर आग विझविणारे बना’, असे परखड व वास्तवदर्शी मत डॉ. नागराज मंजुळे यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.
दरम्यान, सावंतवाडी ही अत्यंत थोर महान लोकांची भूमी आहे. या भूमीतून अनेक नररत्ने जन्माला आली आहेत. त्यामुळे सावंतवाडीत येणे हे मी भाग्य समजतो, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर जनवादी साहित्य संस्कृती - संमेलनाचे उद्घाटक म्हणून कवी तथा सिनेदिग्दर्शक डॉ. नागराज मंजुळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संध्या नरे-पवार, स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष किशोर जाधव, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती महाराष्ट्राचे निमंत्रक सुबोध मोरे, गोव्याचे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत जाधव, संयोजन संमेलनाच्या कार्याध्यक्षा प्रा. प्रतीभा चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी अभिनव पद्धतीने नागराज मंजुळेंच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
उद्घाटनप्रसंगी अत्यंत मोजक्या शब्दांत सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, काही माणसांचा चेहरा नाही त्यांचे साहित्य बोलते, तेच आपण विचारात घेतले पाहिजे. हे मी स्वतः अनुभवले आहे. आज आपण आनंदी जगतो आहोत. पण या आनंदामागे अनेकांचे बलिदान आहे. माणसाचं जगणं नीट करण्यासाठी अनेक पिढ्यांनी आपले अस्तित्व बहाल केलेले आहे. जनवादी साहित्य संमेलन म्हणजे विचारांचे साहित्य संमेलन आहे. म्हणून साहित्य संमेलनातून चांगल्या विचारांची पेरणी होईल, अशी मला अपेक्षा आहे. व्यक्ती व्यक्ती व्यक्तींमध्ये संवाद व्हायलाच हवा, माणूस दूर गेला की तो राक्षस बनतो, म्हणून अशा संमेलनांची समाजात नितांत गरज असल्याचे परखड मत सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यावेळी व्यक्त केले.