सीमा दाते
आगामी मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच की काय सत्ताधारी पक्षाने नवीन प्रकल्पांच्या शुभारंभाचा धडका लावला आहे. खरे तर मार्च फेब्रुवारी महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र कोरोना आणि ओबीसी आरक्षण आणि विशेष म्हणजे प्रभाग रचनेच्या आराखड्यामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली होती. त्यानंतर महापालिकेच्या प्रभाग रचना रद्द करत राज्य सरकारने पुन्हा प्रभाग रचना तयार करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतला आहे. यामुळे कधीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वाढली होती. यामुळे सत्ताधारी शिवसेनेकडून जोरदार विकासकामे आणि प्रकल्पांच्या शुभारंभाचा धडाका सुरू आहे.
आता सर्वोच न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणूक जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर निवडणुकांची हालचाल सुरू झाली आहेच. मात्र कामांचे शुभारंभदेखील सुरू आहे. विशेष म्हणजे या सगळ्या शुभारंभात मंत्री आदित्य ठाकरे जास्त उठून दिसतात. कामे महापालिकेची, महापालिकेवर सध्या प्रशासक नियुक्त आहे, असे असताना अनेक कामांचे शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या हस्ते होताना पाहायला मिळत आहे, तर आदित्य ठाकरेंचा महापालिकेतील वाढलेला वावरदेखील चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक राजकीय पक्षांना आदित्य ठाकरेंचा वावर खटकतोय. भाजपकडून याबाबत टीका सुरू आहेच. पण महाविकास आघाडीतही याबाबत खदखद आहे, असे दिसून येतंय. यासाठी वेगळं उदाहरण द्यायची गरज नाही. मात्र आदित्य ठाकरे आणि महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पवई तलावनजीक सायकल आणि जॉगिंग ट्रॅकला उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर महाविकास आघाडीतले नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋचा आव्हाड यांनी याबाबत न्यायालयाचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल आहे, असे नाही.
आता विषय आहे तो विकासकामांचा, तर गेल्या महिनाभरात विविध प्रकल्प, विकासकामांचे उद्घाटन सुरू आहे. एकंदरीत महिनाभराचा आढावा घेतला, तर ७ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सर्वांसाठी पाणी’ या आपल्या वचनाची पूर्ती केली असून या योजनेचा शुभारंभ केला, त्यानंतर गिरगाव खेतवाडी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती स्तंभाचे लोकार्पण ५ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, तर कुलाबा कूपरेज उद्यानात मोफत वाचनालयाचे उद्घाटन ३ मे रोजी अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते पार पडले. २ मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चर्चगेट स्थानक परिसर, पदपथ येथे विविध कामांचे लोकार्पण केले, तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण २५ एप्रिल रोजी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. १७ एप्रिल रोजी गिरगाव येथील दर्शक गॅलरीचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात बायोम थीमवर आधारित सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण १६ एप्रिल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथे प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे विकासकामांच्या उद्घाटनाची घाई सत्ताधारी पक्षाला होते की काय, असे वाटत आहे आणि म्हणूनच भूमिपूजन व कामांचे लोकार्पण सुरू आहे.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे २ आठवड्यांत निवडणुकांची तारीख जाहीर करावी लागणार आहे आणि दोन आठवड्यांत निवडणुका घ्या, असेही न्यायालयाचे आदेश आहेत. यामुळे आता सत्ताधारी चांगलेच कोंडीत सापडले आहेत. आधी जो प्रभाग रचनेचा आराखाडा केला होता, तो मात्र राज्य सरकारने रद्द केला. त्यानुसार एक प्रभाग २ महापालिकांच्या वॉर्डमध्ये येत होता आणि याच फटका भाजपसहित शिवसेनेच्याही काही नगरसेवकांना बसणार होता. त्यानंतर आता पुन्हा प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून त्याचा अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतला आहे.
मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर सरकारला निवडणूक तारीख जाहीर करावी लागणार आहे; परंतु केवळ दोन आठवड्यांचा अवधी दिल्यामुळे कदाचित २०१७च्या प्रभाग रचनेनुसारच निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाने नगरसेवकांची संख्या २२७हून वाढवून २३६ केली होती, ९ प्रभाग वाढवण्यात आले होते. मात्र आता ही निवडणूक २२७ प्रभागांवरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका मविआ आणि विशेषकरून पालिकेत गेली अनेक वर्षे सत्ता असलेल्या शिवसेनेला पडू शकतो. पण तूर्तास मात्र मतदारांना आकर्षित करण्यासाठी विकासकामांच्या व आपल्या वचनपूर्तीच्या मागे शिवसेना लागली आहे.
seemadatte@gmail.com