नवी मुंबई (प्रतिनिधी) : देवॉन कॉनवे (८७ धावा), रुतुराज गायकवाड (४१ धावा) या सलामीवीरांच्या जोडीने केलेली अफलातून कामगिरी आणि त्याला मिळालेली मोईन अलीच्या अप्रतिम गोलंदाजीची साथ या बळावर चेन्नईने दिल्लीचा ९१ धावांनी दारूण पराभव केला.
चेन्नईच्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या दिल्लीच्या फलंदाजांवर मोठ्या लक्ष्याचा दबाव सपशल जाणवत होता. सलामीवीर भरत ८ धावांवर माघारी परतला. त्याच्या झटपट बाद होण्याने दिल्लीपुढे असलेला दुसऱ्या सलामीवीराचा पेच कायम राहीला आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरही धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
त्यामुळे ३६ धावांवर २ फलंदाज बाद अशा संकटात दिल्लीचा संघ सापडला. मिचेल मार्श आणि कर्णधार रिषभ पंत हे दोघे संघाला संकटातून सावरतील असे वाटत होते. तसा प्रयत्नही त्यांनी केला. पण संघाला विजय मिळवून देणे त्यांना जमले नाही. तळात शार्दुल ठाकूरने थोडी फार झुंज दिली. मात्र अन्य फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. मोईन अलीने दिल्लीच्या फलंदाजांना चांगलेच रोखून धरले. त्याने ४ षटके फेकत अवघ्या १३ धावा देत ३ विकेट मिळवले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईच्या सलामीवीरांनी रविवारचा दिवस गाजवला. रुतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवेच्या धडाकेबाज फलंदाजीने चेन्नईच्या धावफलकावर बिनबाद शंभर धावांचा टप्पा ओलांडला. देवॉन कॉनवेने ४९ चेंडूंत ८७ धावांची मोठी खेळी खेळली. रुतुराजने ३३ चेंडूंत ४१ धावा तडकावल्या. चांगली सुरुवात मिळाल्याने चेन्नईला मोठे लक्ष्य गाठता आले. विकेट हातात असल्याने शिवम दुबेही मोकळेपणाने खेळला. त्याने १९ चेंडूंत ३२ धावांचे योगदान दिले. महेंद्रसिंह धोनीला केवळ ८ चेंडू खेळायला मिळाले. त्याने ८ चेंडूंत नाबाद २१ धावा तडकावत संघाच्या धावसंख्येला गती आणली. चेन्नईने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात २०८ धावांचा डोंगर उभारला.