Sunday, March 23, 2025
Homeमहामुंबईभोंगा आंदोलनाचा लोककलावंतांना फटका

भोंगा आंदोलनाचा लोककलावंतांना फटका

परवानगी घेण्याची पोलिसांची सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सुरू झालेल्या भोंगा नाट्यामध्ये लोककलावंत भरडून निघत आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांनी लोककलांना आणि कार्यक्रमांना चालना मिळू लागली होती. जत्रा, यात्रांमध्ये कार्यक्रम रंगू लागले आहेत. त्यातच भोंग्यांवरून राजकारण सुरू झाल्याने आता कार्यक्रमांदरम्यान पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार लोककलावंत करत आहेत. याचा परिणाम गरीब कलाकारांवर होत असल्याचे लक्षात घेतले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

खान्देश लोककला अकादमीचे शेषराव गोपाळ यांनी राजकारणाचा परिणाम थेट तमाशावर झाल्याचा आक्षेप नोंदवला. ‘राजकारणामुळे मंदिरे, मशिदी यावरील भोंगे बंद करण्याबाबत काही फतवे काढण्यात आले. त्यामुळे आता धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रांत तमाशासाठी भोंगे लावण्यास बंदी करण्यात आली. तमाशा सुरू होण्याआधी पोलिस ठाण्यांकडून भोंगे लावू नका अशी पूर्वसूचना देण्यात येते,’ असे त्यांनी सांगितले.

‘दोन वर्षांहून अधिक काळ तमाशा बंद होता. कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. सरकारने कुठलीही भरीव मदत केली नाही. त्यानंतर आता तमाशा पुन्हा चालू झाला आणि हातात पोटापुरते पैसे येऊ लागले होते. त्यातच भोंग्यांच्या राजकारणामुळे तमाशा कसा करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे,’ अशी व्यथा लोककलाकार मांडत आहेत. आवाज नसेल तर सादरीकरण करायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. राजकारणामुळे लोककलावंतांची उपजीविका बुडेल, असा कधी विचारही कोणी केला नव्हता, अशी भावनाही व्यक्त केली जात आहे. लोककलावंतांनी कार्यक्रम कसे करावेत, याबद्दलही भोंग्यांवरून राजकारण करणाऱ्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

निवडणुकीच्या वेळी किंवा इतर सभांच्या वेळी राजकारणी भोंगे लावणार नाहीत आणि त्यांची ध्वनिमर्यादा नोंदवून समन्यायी पद्धतीने कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा लोककलावंत करत आहेत.

परवानगी घेऊन कार्यक्रम करा’

कार्यक्रम सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी घेऊन करता येतील, असे पोलिसांनी सांगितले. यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांशी संपर्क साधता येईल; तसेच पोलिसांच्या वेबसाइटवरही अर्ज उपलब्ध आहेत. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करून आवाजाची पातळी ठेवावी. आवाजासाठी परवानगी घेतली नसल्यास कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रात्री १० वाजल्यानंतरचे कार्यक्रम ध्वनिक्षेपकाशिवाय करता येतील. धनिक्षेपक नसतानाही आवाजाबद्दल तक्रार आल्यास कारवाई करावी लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -