मुंबई (प्रतिनिधी) : वानींदू हसरंगा डी सिल्वा, जोश हेझलवूड या जोडीची बळी मिळवणारी आणि धावा रोखणारी गोलंदाजी हैदराबादविरुद्ध बंगळूरुच्या विजयात विशेष ठरली. त्याआधी कर्णधार फाफ डुप्लेसीसच्या (५० चेंडूंत नाबाद ७३ धावा) फलंदाजीतील फायरींगमुळे बंगळूरुने १९२ धावांचा डोंगर उभारत ६७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे बंगळूरुने ‘प्ले-ऑफ’च्या रेसमधील आपले स्थान अधिक मजबूत केली आहे.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या हैदराबादचे दोन्ही सलामीवीर पहिल्याच षटकात तंबूत परतले. विल्यमसनने पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा विराटचाच कित्ता गिरवला. त्यालाही भोपळा फोडता आला नाही. हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने एकाकी झुंज दिली. त्याला मारक्रम, पुरनने थोडीफार साथ दिली. त्रिपाठीने ३७ चेंडूंत ५८ धावा केल्या. बंगळूरुच्या वानींदू हसरंगा डी सिल्वा, जोश हेझलवूड या गोलंदाजांच्या जोडीने अप्रतिम गोलंदाजी केली. वानींदू हसरंगा डी सिल्वाने ४ षटकांत केवळ १८ धावा देत ५ बळी मिळवेल, तर जोश हेझलवूडने ४ षटकांमध्ये अवघ्या १७ धावा देत २ बळी घेतले.
सर्वांच्या नजरा खिळलेल्या बंगळूरुच्या विराट कोहलीने रविवारीही निराशाच केली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सुचीथने विल्यमसनकरवी झेलबाद करत विराटला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर फाफ डुप्लेसीस आणि रजत पाटीदार या जोडीने बंगळूरुला शतकाचा टप्पा ओलांडून दिला. मॅक्सवेलने २४ चेंडूंत ३३ धावा तडकावल्या. शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने केवळ ८ चेंडूंमध्ये नाबाद ३० धावांची तुफानी खेळी खेळत बंगळूरुच्या धावांचा वेग वाढवला.