Wednesday, May 14, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

राणांना डिस्चार्ज मिळताच किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे लिलावतीत

राणांना डिस्चार्ज मिळताच किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे लिलावतीत

मुंबई : खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात उपचार घेत होत्या. यावेळी त्यांचे रुग्णालयातले काही फोटो व्हायरल होत होते. त्यांचा एमआरआय मशीनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवर आक्षेप घेत आता शिवसेना आक्रमक झाली आहे. यावरून किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाला धारेवर धरले आहे.


याप्रकरणी शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला आहे. नवनीत राणा स्पाँडिलायसिसचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांचा एमआरआय काढण्यात आला. यावेळी एमआरआय काढत असतानाचे त्यांचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते. यावरूनच पेडणेकर यांनी आक्षेप घेतला आहे. नवनीत राणांचा एमआरआय नक्की झाला की नाही? झाला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्याला अहवाल सादर करावा. एमआरआय रुममध्ये रुग्णासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असताना राणांसोबत चार लोक कसे गेले. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ मला द्या, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली आहे.


राणांना रुग्णालयात शूटिंगची परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही मनिषा कायंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला केला आहे. त्याचबरोबर स्पाँडिलायसिस असताना नवनीत राणांनी उशी कशी काय वापरली, असा प्रश्नही पेडणेकरांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

Comments
Add Comment