- वाणगाव पूर्वेकडील वाकीपाड्यातील आदिवासी शेतकरी हैराण
- धुळीच्या कणांमुळे मुले, वृद्धांमध्ये श्वसनाचे विकार
बोईसर (वार्ताहर) : वाणगाव पूर्वेकडील वाकीपाडा या आदिवासी पाड्याजवळ युएसएमएल लिमिटेड या कंपनीचे सरकारची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर आरएमसी प्लान्ट आणि क्रशर मशीन सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्लान्टमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून त्याचा फटका आदिवासी पाड्यातील नागरिक आणि बागायती शेतीला बसत असल्याने येथील आदिवासी शेतकरी हैरणा झाले आहेत.
जेएनपीटी ते दिल्लीदरम्यान पश्चिम रेल्वेला समांतर डीएफसीसी प्रकल्पाचे काम सुरू असून यासाठी लागणारे रेडीमिक्स काँक्रीट ग्रीन झोन असलेल्या वाणगाव वाकीपाडा येथील सर्वे क्र. ७४ येथील आरएमसी प्लान्टमध्ये तयार केले जाते. यासाठी मोठे क्रशर मशीन बसविले आहे. या प्रकल्पासाठी यूएसएमएल लिमिटेड या कंपनीने महसूल आणि प्रदूषण विभागाची कोणतीही आवश्यक परवानगी घेतलेली नाही.
आरएमसी प्लान्ट आणि क्रशर मशीनसाठी प्रकल्पासाठी शेतजमिनीची अकृषिक परवानगी घेणे आवश्यक आहे परंतु या कंपनीकडे अकृषिक परवानगी नसल्याचे तसेच रेती, खडी या बांधकाम साहित्याची रॉयल्टी न घेतल्याप्रकरणी जागामालक आणि कंपनीला डहाणूच्या तहसीलदारानी जानेवारी महिन्यात नोटीस बजावली होती.
वाणगाव येथील हा आरएमसी प्लान्ट आणि क्रशर मशीन वाकीपाडा या आदिवासी पाड्याच्या जवळ असल्याने त्याचा मोठा त्रास नागरिकांना होत आहे. तसेच क्रशर मशीनमधून बाहेर निघणाऱ्या धुळीच्या कणांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पाड्यातील लहान मुले आणि वृद्ध यांना श्वसनाचे विकार जडत आहेत. या भागात मिरची, इतर बागायती पिकांची मोठी लागवड केली जात असून क्रशर मशीनच्या प्रदूषणामुळे शेतीला मोठा फटका बसतो आहे.
वाणगाव परिसरात तयार होणारी तिखट मिरची आणि ढोबळी मिरची संपूर्ण देशात प्रसिद्ध असून परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यामध्ये साधी मिरची ८०० हेक्टर तर ढोबळी मिरचीचे २५० हेक्टरवर पीक घेतले जाते. यासाठी येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत बागा उभारल्या आहेत. वाकीपाड्यानजीक यूएसएमएल कंपनीच्या कास्टिंग यार्डमधील आरएमसी प्लान्टमधून उडणारे धुळीकण हवेद्वारे आजूबाजूच्या बागायतीमधील पिकांवर बसत असल्याने मोठ्या प्रमाणात रोग पसरून पिकांची प्रत घसरल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसून त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या प्लान्टवर ताबडतोब बंदीची कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
संबंधित कंपनीची चौकशी करू. जर त्यामध्ये काही अनियमितता आढळली, तर कंपनीवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल. – अभिजीत देशमुख, तहसीलदार डहाणू
युएसएमएल लिमिटेड कंपनीच्या वाणगाव येथील आरएमसी प्लान्ट आणि क्रशर मशीनसाठी महसूल आणि प्रदूषण नियंत्रण संबंधित सर्व आवश्यक परवानग्या कंपनीकडे आहेत. तसेच शेजारील आदिवासी पाडा आणि शेतीचे काही नुकसान होत असेल, तर त्याची माहिती घेण्यात येईल. – के. के. नायर, व्यवस्थापक