१७८ जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ
अहमदाबाद : देशातील काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. यात गुजरातचा देखील समावेश आहे. राजधानी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) मध्ये २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या संस्थेतील १७८ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
एकाच वेळी एनआयडीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने अहमदाबाद महापालिकेने कॅम्पस परिसराला कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात केलेय. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दोन दिवसात एनआयडीमध्ये १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली. ज्या विद्यार्थ्यांना लागण झाली आहे त्यामध्ये काही परदेशी विद्यार्थ्यी देखील असल्याचे समजते. पालिकेने मुलांचे वसतीगृह आणि सी ब्लॉक हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. संस्थेतील सर्व शिक्षक आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. संस्थेतील सर्वांचे टेस्ट घेण्यात आली आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
गुजरातमधील एखाद्या शैक्षणिक संस्थेत कोरोनाचे रुग्ण आढळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी एप्रिल महिन्यात गुजरात नॅशनल लॉ विद्यापीठात १६२ रुग्ण आढळले होते. देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात आहे. काल म्हणजेच ८ मे रोजी २४ तासात ३ हजार ४५१ रुग्ण आढळलेत. एकट्या गुजरातमध्ये १४७ सक्रिय रुग्ण आहेत. तर १ हजार ५९० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.