
प्रा. केशव आचार्य
नुकत्याच पार पडलेल्या उद्गीर येथील मराठी साहित्य संमेलनात आयोजित एका मुलाखतीच्या कार्यक्रमात अशोककुमार पांडे नावाचे एक इतिहासकार म्हणाले, ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातून देशभरात मुस्लीम-विरोधी वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. इतिहासकाराने असे म्हणावे आणि तेही साहित्य संमेलनात, म्हणजे इतिहासाशी बेईमानी करणे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या My thoughts on Pakistan या पुस्तकात पाने ४५ ते ६० मध्ये मुस्लीम आक्रमकांनी भारतातील मंदिरांचा विध्वंस केला, मूर्ती फोडल्या आणि हिंदूंचे धर्मांतर केले, असा उल्लेख आहे. याबाबत हे इतिहासकार काय म्हणतील? मुस्लीम आक्रमकांनी भारतातील नालंदा (बिहार) आणि तक्षशीला (सध्या अफगाणिस्तान मध्ये) येथील विश्वविख्यात विद्यापीठे जाळून टाकली; औरंगजेब, अल्लाउद्दीन खिलजी यांनी फक्त हिंदूंवर जाचक जिझीया कर लादला इत्यादी इतिहास शिकवणे चूक आहे का? काही राजकीय हेतूने इतिहासकाराने सत्य इतिहास दडपून टाकणे म्हणजे इतिहासावर फार मोठा अन्याय होय.
किती दिवस तेढ निर्माण होईल? या भीतीने सत्य दडपून असत्य कथा (नॅरेटिव्ह) जनतेत पसरवत राहणार? त्याऐवजी धर्मापेक्षा राष्ट्र, संविधान महत्त्वाचे हे जनतेच्या मनावर बिंबवल्यास तेढ निर्माण होणार नाही. “वसुधैव कुटुंबकम्” ही आपली भारतीय संस्कृती! “यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता:’ (मनुस्मृती) यात काय वाईट आहे? या चित्रपटात केवळ हिंदूंवरील अत्याचार दाखवले आहेत, म्हणून या चित्रपटाला विरोध करावा, असे अप्रत्यक्षपणे सुचविणे म्हणजे सेक्युलरिझमला विरोध आणि भारतीय घटनेला विरोध, हे समजून घेतले पाहिजे. “काश्मीर फाइल्स” सिनेमात आपल्या संस्कृतीमधील सत्य, अहिंसा, बंधुता, एकता, मानवता ही नैतिक मूल्ये काही नराधमांनी पायदळी तुडवलेली दाखवली असली तरी भगवान बुद्ध, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक साधू संतांच्या या देशात त्या नराधमांबद्दल प्रेक्षकांच्या मनात केवळ तिटकाराच निर्माण होतो. त्यामुळे हा सिनेमा पाहून जनतेमध्ये तेढ निर्माण होईल, असे म्हणणे अत्यंत चुकीचे होय. उलट, हा सिनेमा पाहून असे भयानक हिंसाचाराचे प्रसंग भविष्यात टाळण्याचा प्रयत्न लोक करतील, हे निश्चित! या दृष्टिकोनातून विचार केल्यास मानवतेच्या हितासाठी हा सिनेमा प्रत्येकाने पाहणे हितकारक ठरेल.
‘सत्य हाच परमेश्वर’ असे म. गांधी म्हणत. गांधीजींचा हा विचार आजही समयोचित आहे, हेही काश्मीर फाइल्सने दाखवले. ३२ वर्षे धूर्त राजकारणी नेते आणि भ्रष्ट प्रसारमाध्यमे यांनी दडपून ठेवलेला नरसंहार विवेक अग्निहोत्री यांनी जनतेपुढे आणून जनताजागृतीचे महान राष्ट्रकार्य केले आहे. केवळ धूर्त राजकारणी नेते व त्यांचे समर्थक यांचाच ‘काश्मीर फाइल्स’ला विरोध आहे. स्वार्थी, परिवाराच्या समृद्धीसाठी झटणाऱ्या भ्रष्ट नेत्यांना समाजात तेढ, संघर्ष हवा असतो. जातीय वा धार्मिक संघर्ष चालू ठेवला की, त्यांच्या भ्रष्टाचाराकडे जनतेचे आपोआप दुर्लक्ष होते. कारण भ्रष्टाचार हा देशाचा सर्वात मोठा शत्रू असला तरी धार्मिक जवळीक बुद्धी बाजूला ठेवून, केवळ भावनेला बळी पडणाऱ्या सामान्य व्यक्तीला अधिक भावते. यावर उतारा म्हणून ‘मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे’, हे डॉ. आंबेडकर यांचे बोल प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजेत.
इराण देशाला पूर्वी पर्शिया म्हणत असत. त्या काळात तेथे अनेक पारशी लोक राहत असत; परंतु सुमारे ९०० वर्षांपूर्वी तेथे मुस्लिमांची संख्या वाढली आणि त्यांनी पारशी लोकांना तेथून हाकलून दिले. ‘काश्मीर फाइल्स’मध्ये काश्मिरी पंडितांना तेथील मुस्लीम लोकांनी जसे हाकलल्याचे दाखवले आहे, अगदी तसेच! त्यामुळे हा सिनेमा पाहून पारशी लोकांना हिंदू पंडितांचे व भारतीयांना पारशी लोकांचे दु:ख नीट कळेल. पर्शियामधून देशोधडीला लावलेले पारशी जहाजाने भारतातील सूरत व मुंबई बंदरात आले. भारतात या निर्वासितांचे स्वागत झाले. पारशी लोकही सहिष्णू भारतीयांत समरस झाले; ते स्थानिक लोकांची गुजराथी भाषा शिकले. त्यांची खूप प्रगती झाली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातही भाग घेतला. हा इतिहास माहीत झाल्याने सर्व भारतीयांचे हितच होईल.
इतिहासापासून बोध घ्यायचा असतो, चुका टाळायच्या असतात. पर्शियामधील मुस्लिमांनी पारशी लोकांवर आणि काश्मीरमधील मुस्लिमांनी तेथील हिंदूंवर अत्याचार केले म्हणून कोणीच सर्व आणि अन्यत्र वसलेल्या मुस्लिमांना दोष देत नाही. मुस्लिमांनीही तसे मानू नये. त्यांनीही अत्याचारी, मानवताविरोधी लोकांचा धिक्कार करावा. त्यामुळे तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.
या देशात हिंदू बहुसंख्य आहेत आणि ते सहिष्णू आहेत, हे सत्य समस्त जनतेने नीट समजून घेतल्यास देशात तेढ निर्माण होणार नाही. भारत, पाकिस्तान, बांगलादेश येथील बहुसंख्य मुस्लीम मूळचे हिंदूच होते, असे अनेक मुस्लीम विचारवंत मानतात. ते हिंदूंसारखेच दिसतात, अरबांसारखे दिसत नाहीत; त्यांचा आणि हिंदूचा डीएनए एकच आहे, असेही म्हटले जाते. त्यांची मूळ संस्कृती आणि पूर्वज धर्मांतराने बदलत नाहीत. देशातील साधू, संत देशासाठी योगदान देणारे देशभक्त हे आपले पूर्वज राहतात.
‘काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा पाहिल्यावर आपल्या पूर्वजांचे धर्मांतर कसे झाले असावे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न येथील मुस्लिमांनी करावा. काही कुटुंबीयांत वंशावळीचा इतिहास लिहिला जातो. मुस्लिमांनीही तसा इतिहास लिहावा, वाचावा व कोणी कोणी स्वेच्छेने धर्मांतर केले, याची नोंद घ्यावी. या सिनेमामधून मिळणारे उत्पन्न काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येईल, असे विवेक अग्निहोत्री यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या उदात्त हेतूच्या पूर्ततेसाठीही अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळणे राष्ट्रहितकारक ठरेल. म्हणूनच प्रत्येक भारतीयाने ‘काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा पाहणे राष्ट्रहितकारक ठरेल. या दृष्टीने शासनाने हा चित्रपट करमुक्त करावा, ही मागणी योग्य वाटते.