अर्चना सोंडे
आपल्या मुलासाठी एका रात्रीत बुरुज चढणाऱ्या हिरकणीची कथा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आपल्या प्रत्येक भारतीय घरांत अशी हिरकणी असते ती आईच्या रूपात. ही हिरकणी अशीच आहे, आपल्या बाळासाठी वाट्टेल ते कष्ट उपसणारी, आज तिच्या कष्टांना खऱ्या अर्थाने फळ आलंय. पहिलं बाळ म्हणजेच तिचा मुलगा आता कॉलेजच्या दुसऱ्या वर्गाला जाईल आणि दुसरं म्हणजे तिचं स्वप्न आता प्रत्यक्षात रूप घेत आहे. ही हिरकणी म्हणजे इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेडची वैशाली स्वरूप.
वैशालीचे बाबा पोलीस दलातील अधिकारी, तर आई गृहिणी. वैशालीचं प्राथमिक शिक्षण कांजूर मार्गच्या सरस्वती विद्यालयात झालं, तर डोंबिवलीच्या आदर्श विद्यालयात दहावीपर्यंत शिकली. केळकर महाविद्यालयात बी.ए.साठी तिने प्रवेश घेतला. वैशालीला नाटकात अभिनय करायची आवड होती. विद्यापीठातल्या अनेक एकांकिकांमध्ये तिने अभिनय केला. तिच्या अभिनयाचं कौतुक सारेच शिक्षक आणि विद्यार्थी करायचे. वैशालीच्या आई-बाबांना आपल्या लेकीचा हा अभिनयाचा मार्ग बिलकूल पसंत नव्हता. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांत शिकत असतानाच वैशालीचं लग्न घरच्यांनी लावून दिलं आणि संसाराच्या गाड्यात अभिनय, शिक्षण सारं काही थांबलं.
लग्नानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला. ध्रुव त्याचं नाव. ध्रुव ताऱ्यासारखं वैशालीच्या आयुष्यात अढळ स्थान असणाऱ्या ध्रुवसाठी वैशालीचा आयुष्यासोबत खरा संघर्ष सुरू झाला. एकल मातृत्व नशिबी आलेल्या वैशालीने परिस्थितीशी दोन हात केले. आपल्या बाळाला स्वत:च्या कर्तृत्वावर मोठे केले. २०१०च्या आसपास तिने साकीनाक्याच्या एमएसएमईमधून ‘गोल्ड अप्रेजल’ नावाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सोन्याचं शुद्धीकरण कसं करावं याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण तिने घेतले. त्यानंतर कुर्ल्यात तिने शुद्धीकरणाचा कारखाना सुरू केला. दुर्दैवाने हा कारखाना तोट्यात गेला. हा तोटा वैशालीसाठी प्रचंड मोठा होता. तोट्यातून बाहेर पडण्यासाठी नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका शैक्षणिक संस्थेत समुपदेशक म्हणून ती नोकरी करू लागली.
डोंबिवली ते सीएसटी अशा ट्रेनच्या वाऱ्या सुरू झाल्या. सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामाची वेळ होती. याचवेळी तिला शिरा-पोहे विकण्याची कल्पना सुचली. मुंबई ही स्वप्ननगरी आहे. तुमची वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी असेल, तर ही स्वप्ननगरी तुम्हाला निश्चितच आपल्या कवेत घेते, हे अनेक अभिनेते, राजकारणी, क्रिकेटपटू यांच्या चरित्रातून जाणवते. वैशाली पहाटे चार वाजता उठायची. शिरा-पोहे तयार करून मोठ्ठ्या डब्ब्यात भरून सहा सव्वासहाला सीएसटी फास्ट पकडायची. सीएसटीला उतरल्यानंतर शिरा-पोहे विकायला उभी राहायची. चव दमदार असल्याने काही वेळातच डब्बा रिकामा व्हायचा. परत सामानांची आवराआवर करत ती ऑफिसकडे धाव घ्यायची. संध्याकाळी ऑफिस सुटलं की, त्या डब्ब्यासह पुन्हा डोंबिवली फास्ट पकडायची, घरी आल्यानंतर जेवण तयार करून आपल्या चिमुरड्याला भरवायची. पहाटे चार वाजता सुरू झालेला दिवस रात्री १२ वाजता संपायचा.
हा संघर्ष तिने तीन-चार महिने केला. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट व्हायची. एवढाच व्यवसाय करून ती थांबली नाही, तर सीझननुसार तिने पणत्या, रांगोळ्या, साबण, तेल विकले आहे. इमानेइतबारे पैसा कमावणे हाच एक उद्देश होता. दहा वर्षे त्या शैक्षणिक संस्थेत काम केल्यावर कचरा व्यवस्थापन करणाऱ्या एका गुजरातच्या कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीचे मुंबईतील काम वैशाली हाताळू लागली. सोबत भारतभर मार्केटिंगचे काम पण तिलाच करावे लागे. कॉर्पोरेट कंपन्यांचं ऑफिस असो की कचऱ्याचे वर्गीकरण केलं जाणारं ठिकाण अशा प्रत्येक ठिकाणी वैशाली जाई. या क्षेत्रातलं तिचं ज्ञान चांगलंच वाढलं. आत्मविश्वास देखील आला. आता आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, असं तिने ठरवलं. वैशालीच्या बाबांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. आपली लेक हे सारं उत्तम सांभाळेल हा त्यांना विश्वास होता.
या व्यवसायातली तिची समज वाखाणण्याजोगी होती. किंबहुना रिफायनरी क्षेत्रातील ती पहिलीच महिला उद्योजक होती. तिच्या प्रवेशाने तिच्या स्पर्धकांची हवा टाईट झाली. ‘आप यहा काम मत करो’ अशी थेट धमकीसुद्धा दिली गेली. पण शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या वैशालीने अशा धमक्यांना भीक घातली नाही. लॉजिस्टिक, ऑपरेशन टीम, लॅब टेक्निशियन, मार्केटिंग अशा विभागांमध्ये काम करणारे १२ कर्मचारी वैशाली स्वरूप यांच्याकडे कार्यरत आहेत. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यांत त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे. टाटा, रिलायन्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, जीटीएल इन्फ्रा, बीपीटी, कस्टम अशा अनेक कंपन्यांना वैशाली स्वरूप यांची इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ई-कचरा व्यवस्थापनाची सेवा पुरवते.
आपण समाजाचं देणं लागतो ही भावना वैशाली स्वरूप पदोपदी जपतात. त्यामुळे सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून त्यांना महिला उद्योजिका घडवायच्या आहेत. आपला देश अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ७५ महिलांना या उद्योगासाठी तयार करायचं आहे. निकष एकच कष्ट करण्याची तयारी. महाराष्ट्राच्या ग्रामीण, शहरी अशा कोणत्याही महिलेला जरी स्वाभिमानाने पैसा कमवायचा असेल, तर त्यांनी वैशाली स्वरूप यांच्याशी संपर्क साधलाच पाहिजे. सोबतच देशभरात ई-कचरा संकलन करणारी ७५ संकलन केंद्रे उभारण्याचा देखील त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने काही सामाजिक संस्थांसोबत त्यांची बोलणी सुरू आहेत. विद्यार्थी हे उद्याचा देश घडवत असतात, त्यामुळे या विद्यार्थांचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्यान द्यायचा देखील त्यांचा मानस आहे. नुकताच त्यांनी स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता.
प्रचंड कष्ट, अविरत संघर्ष, हार न मानण्याची वृत्ती आणि सातत्य यामुळेच वैशाली स्वरूप या लेडी बॉस पुरुषाचे प्राबल्य असणाऱ्या ई-कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील पहिल्या महिला उद्योजिका ठरल्या आहेत.