नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील पावणे खैरने अद्योगिक वसाहतीत शुक्रवारी (६ मे) दुपारी लागलेली आग अद्याप शमलेली नसून यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईतील पावणे खैरने आद्योगिक वसाहतीत शुक्रवारी (६ मे) दुपारी लागलेली आग अद्याप शमलेली नसून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही रबर कंपनीत काम करणारे होते. अय्यर, निखिल असे मृत व्यक्तींची नावे असून त्यांचे पूर्ण नाव कळलेले नाही, तर तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तिसरा मृतदेह १२च्या सुमारास आढळून आला आहे.
एमआयडीसीतील भूखंड क्रमांक १४२ वरील वेस्ट कोस्ट पॉलीकेम या रासायनिक कंपनीला शुक्रवारी (६ मे) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली होती. रासायनिक कंपनीतील रासायनिक द्रव्यांचे छोट्या-मोठ्या पिंपांचे स्फोट होत असल्याने आगीजवळ जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत आहेत.
दरम्यान, याच कंपनीच्या शेजारी असलेली हिंद एलास्टोमर्स प्रा. लि. या रबर कंपनीलाही आग लागली. ही आग अद्याप शमलेली नाही. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुका मेव्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला आग लागून त्यातील बदाम साठ्याला लागलेली आगही अद्याप धुमसत आहे. त्यामुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर निघत आहेत, अशी माहिती मनपा अग्निशमन दल प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.