मुंबई (हिं.स.) : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) उड्डाण पुलाच्या विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम १३ ते २४ मे दरम्यान केले जाणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल १२ दिवस बंद राहणार आहे. जोगेश्वरी (पश्चिम) मधील लिंक रोडला पूर्वेकडील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोडणारा हा उड्डाणपूल आहे. या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. दरम्यान वाहतूक वळविण्यात येणार असून रस्त्यावर कोंडी होण्याची शक्यता आहे. पण, या कालावधीत पुलाखालून वाहतूक सुरू राहणार आहे.
पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील उड्डाणपुलावरून पश्चिम ते पूर्वेकडे प्रवास करता येतो. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी मिळून हा उड्डाणपूल बांधला आहे. वाहतुकीसाठी चांगला पर्याय असलेल्या या उड्डाणपुलाची डागडुगी करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाणपुलाच्या २०० बेअरींग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले. वाहतूक बंद न करता बेअरींग बदलण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २०० पैकी १४८ बेअरींग बदलण्यात आल्याची माहिती. जितके बेअरींग बदलण्यात आले आहेत, त्या भागातील एक्सपान्शन जॉइंट आता बदलण्यात येतील.
या कामासाठी मात्र उड्डाणपूल बंद ठेवावा लागणार आहे. या काळात उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू राहील. एक्सपान्शन जॉइंट बदलण्याचे काम दुसऱ्या टप्प्यातही करण्यात येणार आहे. यानंतरही एक्सपान्शन जॉइंट बदलण्यासाठी उड्डाणपूल काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.