Wednesday, July 24, 2024
Homeकोकणरायगडअमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे आव्हान

अमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे आव्हान

दीड वर्षात जिल्ह्यात २७ गुन्ह्यांची नोंद

अलिबाग (प्रतिनिधी) : वाढत्या शहरीकरणाबरोबरच रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांशी निगडीत गुन्हेही वाढीस लागले आहेत. दीड वर्षात रायगड पोलीस दलाच्या हद्दीत अमली पदार्थ तस्करी आणि वितरणाचे २७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर अमली पदार्थ तस्करी आणि वितरण रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

जिल्ह्यात सन २०२० अमली पदार्थांशी निगडीत एकूण २० गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकूण ६० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १९ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहेत. ज्याची अंदाजे किंमत ३८ हजार रुपये आहे. १३४ किलो ४७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ज्याची अंदाजे किंमत १६ लाख ६७ हजार ४०१ रुपये आहे, तर सन २०२२ मध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात अमली पदार्थांशी निगडीत एकूण ७ गुन्ह्यांची नोंद झाली. यात ८ आरोपींना अटक करण्यात आली. यात २१ किलो ३४८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ज्याची अंदाजे किंमत ३ लाख ४२ हजार ६८० रुपये आहे.

जिल्ह्यात वाढत्या शहरीकरणाबरोबर अमली पदार्थांशी निगडीत गुन्ह्यांमध्येही वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आणि मुंबई, ठाणे नवीमुंबई लगत असणारे तालुके या गुन्ह्यांच्या केंद्र स्थानी आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांना रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.

या पार्श्वभुमीवर जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने पोलीस दल, अन्न औषध प्रशासन विभाग, सिमा शुल्क विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कृषी, आरोग्य विभाग आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांनी करायच्या उपाययोजनांबाबत निर्देश देण्यात आले.

जहाजांची हवी तपासणी…

रायगड जिल्ह्यात जे. एन. पी. टी., दिघी पोर्ट व इतर काही बंदरे येथे विविध वस्तूंची आयात निर्यात होत असते. त्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता अमली पदार्थांच्या आयात-निर्यातीवर विशेष लक्ष ठेऊन आलेल्या जहाजांची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल सादर करावा. त्या माध्यमातून अमली पदार्थाची आयात-निर्यात आढळून आल्यास तत्काळ पोलीस विभागाला कळविण्याबाबत सूचना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या वेळी दिले.

कुरिअरची तपासणी गरजेची

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खसखस किंवा गांजाच्या पिकांची अवैध लागवड होणार नाही, याबाबत दक्षता घेऊन तसे आढळून आल्यास तत्काळ पोलीस विभागाला कळवावे, टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुरिअर गोडाऊनची नियमितपणे तपासणी करून डार्कनेट व कुरिअरच्या माध्यमातून अमली पदार्थांची मागणी, वाहतूक व पुरवठा होणार नाही, याकडे टपाल विभागाने लक्ष ठेवावे. तसेच त्या माध्यमातून अमली पदार्थाची वाहतूक आढळून आल्यास तत्काळ पोलीस विभागाला सूचित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

जनजागृती करावी…

अमली पदार्थाचे व्यसन असलेल्या व्यक्तींची माहिती व व्यसनमुक्ती केंद्राना संपर्क साधून तेथे व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना कोणता अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन आहे, याबाबत माहिती संकलित करून पोलीस विभागाला कळवावे. रायगड जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, झोपडपट्टी परिसर इ. ठिकाणी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत बॅनर, पोस्टर, पथनाट्य, सोशल मिडीया, स्थानिक प्रसारमाध्यमे यांद्वारे अधिकाधिक माहितीचा प्रसार करून जनजागृती करण्यात यावी, अशी सूचना केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -