Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरजव्हारमधील सनसेट पॉइंट परिसरात तळीरामांचा उच्छाद

जव्हारमधील सनसेट पॉइंट परिसरात तळीरामांचा उच्छाद

नगर परिषदेकडून चाप लावण्याची पर्यटनप्रेमींची मागणी

जव्हार (वार्ताहर) : जव्हारचे नाव येताच थंड हवेचे ठिकाण. निसर्गाने मुक्तहस्ताने रंगांची उधळण केलेले एक संस्थानकालीन प्राचीन शहर. मात्र अशा या शहराची दुरवस्था होत आहे. तळीरामांची सनसेट पॉइंट परिसरात रात्रीच्या वेळी दारू पार्टी सुरू असते. दारू पिऊन बाटल्या रस्त्यावर फोडणे, सिगारेट, गुटखा खाऊन थुंकणे असे प्रकार घडत आहेत. हे पर्यटनस्थळ अस्वच्छ करण्याचा प्रयत्न नगर परिषद प्रशासनाने उधळून लावला पाहिजे, अशी मागणी पर्यटनप्रेमींनी केली आहे.

आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा तालुका न्याहळण्यासाठी पर्यटक, लहान थोर मंडळींना सोबत घेऊन येतात. अशावेळी दारूच्या बाटल्या रस्त्यावर पडलेल्या असणे, गुटखा खाऊन थुंकलेले असणे हे तेथील सौंदर्य विद्रूप करते.

जव्हार नगरपरिषद हद्दीतील सनसेंट पॉइंट हे मनमोहक व निसर्गरम्य पर्यटनस्थळ असल्याने, या ठिकाणी रोजच पर्यटकांची रेलचेल असते. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटक अधिक असतात. मात्र रात्रीच्या वेळी तळीराम तेथे दारू पार्टी करून परिसर अस्वच्छ करतात. काही तळीराम दारूच्या बाटल्या फोडून काचा करतात. त्या पडलेल्या काचांमुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो.

व्यसन करण्यास मज्जाव हवा

जव्हार शहराबाबत मी खूपच भारावून गेलो होतो. सनसेट पॉइंट मन प्रसन्न करणारे दर्शन घडविते. परंतु या ठिकाणी दारू पार्टी किंवा कोणतेही व्यसन करण्यास मज्जाव केला पाहिजे. तळीरामांच्या त्रासामुळे पर्यटनाला बाधा होते. सृष्टीसौंदर्य अबाधित राहिले पाहिजे, असे नाशिक येथील पर्यटनप्रेमी स्वप्नील बागुल म्हणतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -