मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरिता २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शनिवारी गोरेगाव पूर्व येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आता खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेने ‘सर्वांसाठी पाणी’ हे नवे धोरण जाहीर केले आहे. या प्रकल्पाद्वारे मुंबईकरांना रोज समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पातून अनेक विशेष तरतुदींची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी एक म्हणजे, ‘सर्वांसाठी पाणी’. याआधीही सत्ताधारी शिवसेनेने २४ तास पाणी देण्याचे मुंबईकरांना आश्वासन दिले होते. मात्र याचा केवळ प्रायोगिक प्रकल्प मुलुंड-वांद्रे पश्चिममध्ये सुरू करण्यात आला. पण त्यानंतर तो बंद पडला. मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे ४,२०० दशलक्ष लीटर असून सध्या होणारा पुरवठा ३,८०० दशलक्ष लिटर आहे.
पालिकेच्या जलविभागामार्फत पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. दिवसामागे २५ ते ३० टक्के म्हणजे दररोज सुमारे ९०० दशलक्ष लीटर पाण्याची चोरी, गळती होते. त्यामुळे मुंबईकरांना दररोज सुमारे २,९०० दशलक्ष लिटर एवढेच पाणी मिळते. उर्वरित तूट भरून काढण्यासाठी पालिकेचे धोरण महत्त्वाचे ठरणार असल्याचे पालिका अधिकारी सांगतात.
तसेच मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडं पाणी मिळणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून २०० दशलक्ष लिटर गोडं पाणी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.