Friday, March 21, 2025
Homeकोकणरायगडमुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर दरोडा

मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर दरोडा

नवीन पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल जवळून जाणाऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर रात्री – अपरात्री वाहनचालकांना धाक दाखवून दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या एका टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे व.पो.नि. रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने पकडले असून त्यांच्या कडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत साजिद कयूम अन्सारी हा मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेने पुणे येथे जात असताना एक्सप्रेसवर २० ते २५ वयोगटातील तरुणांनी त्याचा टँकर अडवला व त्याला मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल फोन काढून ते पसार झाले. यावेळी टँकरचालकाने प्रतिकार केला असता टोळक्याने त्यांच्याकडील असलेल्या दांडक्याने कपाळावर मारहाण केली व ते पळून गेले. अशाच प्रकारे या टोळक्याने दुसऱ्या टेम्पो चालकासही लुटले होते.

या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच सदर तपास पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ चे शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोनी अंकुश खेडकर, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक अविनाश पाळंदे, सहा पोलीस निरीक्षक संजय गळवे, सपोउनि मनोहर चव्हाण, पोहवा विकास साळवी, पोहवा मंगेश भूमकर, वैभव शिंदे, पोना राकेश मोकल, पोशी भीमराव खताळ, तुकाराम भोये, पोना जयदीप पवार, पोना पंकज चांदीले, प्रकाश मेहेर, सुनिल कुदळे या पथकाने सुरु केला.

गुप्त बातमीदारामार्फत मोबाइल विक्री करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती घेत असताना एक संशयित इसम खालापूर व उरण परीसरात मोबाइल विक्री करत असल्याची माहीती प्राप्त झाली. तांत्रिक तपासात सदर इसमाचा प्रस्तुत गुन्हयात समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. या इसमाकडे केलेल्या चौकशीत त्याचे इतर चार साथीदार हे खालापूर परीसरातील आदिवासी पाड्यावर राहणारे अत्यंत चपळ, काटक व वेळप्रसंगी अचानक हल्ला करणारे आरोपी असल्याची माहीती मिळाली.

गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर ४ आरोपींच्या वास्तव्याबाबत माहीती घेवून खालापूर रसायनी, खोपोली परीसरातील अनेक आदिवासी पाड्यांवर अत्यंत सावधपणे सापळा रचून आरोपीना शिताफिने अटक केली. त्यामध्ये संजय पवार (३०), कुमार पवार (२३), अविनाश धारपवार (२०), रितेश जाधव (१८) व अक्षय पवार (२१) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून विविध कंपनीचे २९ मोबाईल तसेच, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हस्तगत केली. त्यांच्या अटकेमुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींची या पूर्वी खोपोली, खालापूर तसेच पुणे याठिकाणी सुद्धा गुन्हे केल्याची माहिती मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -