Categories: कोलाज

‘पिया ऐसो जिया में समाय गयो रे…’

Share

श्रीनिवास बेलसरे

हिंदी चित्रपटसृष्टीत एकेकाळी गुरुदत्त या नावाला केवढे वजन होते हे सर्वांनाच माहीत आहे. ‘कागज के फूल’ हा त्यांचा सिनेमा आला १९५९ला. मात्र तो साफ कोसळला कारण त्याचे कथानक आणि त्याला दिलेली ट्रीटमेंट लोकांच्या तत्कालीन आकलनाच्या बाहेरची होती. एका अर्थाने तो काळाच्या पुढचा सिनेमा होता. तो साफ कोसळल्याने गुरुदत्त यांची करिअर अगदी संपणार की काय असे वाटू लागले.

गंमत म्हणजे नंतर अनेक वर्षांनी सिने-समीक्षकांना आणि लोकांना हा सिनेमा इतका आवडला की, आज तो अनेक देशातील सिनेमाच्या शिक्षणक्रमाचा भाग बनला आहे. पण त्यावेळी मात्र व्हायचे तेच झाले! ‘कागज के फूल’ नंतर खचून गेलेल्या गुरुदत्तनी आता कधीही दिग्दर्शन करायचे नाही, असा निर्णय घेऊन टाकला! त्यामुळे मग १९६२ साली आलेल्या ‘साहीब बीबी और गुलाम’चे दिग्दर्शन अबरार अलींकडे गेले.

‘साहिब बीबी और गुलाम’ ही एका ऐय्याश जमीनदाराची कथा. त्याच्या बाहेरख्याली स्वभावामुळे त्याची सुशील पत्नी जे भोगते ते या कथेचे मुख्य सूत्र. सिनेमाची शकील बदायुनी यांनी तबियतने लिहिलेली सर्व गाणी हिट झाली. हेमंतकुमारचे संगीत तर लाजबाब होते. वेगवेगळ्या गाण्याच्या प्रकारात प्रत्येक गाणे अद्वितीय ठरते. यातली कोठीवर गायलेली एक कव्वाली केवळ अप्रतिम आहे.

जुन्या शांत विलासी सरंजामशाहीत कोणतेही सुख घाईघाईत ओरबाडायचे नसे. त्याकाळी तशी गरजच नसायची. प्रत्येक आनंद, सुख, विलास हा एका तरल पातळीवर, सावकाश, चाखण्याचा, भोगण्याचा तो काळ! नुसते आपल्या प्रिय प्रेमपात्राकडे डोळे भरून पाहणे, त्याच्याशी होणाऱ्या नजरानजरेचा, एखाद्या सूचक गाण्याचा आनंद रात्रभर घेणे, हीसुद्धा किती रोमँटिक कल्पना मानली जायची! अशाच प्रसंगावर एक गाणे शकील बदायुनी यांनी लिहिले होते. ती या सिनेमातील एक अजरामर कव्वाली म्हणावी लागेल.

“साकीया आज मुझे नींद नही आयेगी,
ना हैं तेरी महफिलमे रतजगा हैं!

प्रत्येक शौकीन रसिकाने ऐकलीच पाहिजे, अशी ही मनाला दीर्घकाळ रिझवणारी कव्वाली! दिग्दर्शकांनी असेच एक गीत दिले होते मीना कुमारीच्या तोंडी. पतीच्या उपेक्षेमुळे मनातल्या मनात कुढणाऱ्या सुंदर पत्नीला पतीचे आपल्याकडे परत येणे ही सुखाची पर्वणीच वाटायची. त्यावेळची तिची प्रेमातुर मन:स्थिती, भावनिक चढ-उतार, संभाव्य मिलनाच्या अनावर ओढीने केलेले सोळा शृंगार हे सगळे शकील बदायुनी यांनी या गाण्यात काठोकाठ भरले आहे. गाणे जितक्यांदा ऐकावे तितक्यांदा काहीसा अनुनासिक आवाज असलेली गीता दत्तच या गाण्यासाठी परफेक्ट गायिका होती हे जाणवत राहते!

आशाताईंसारखे गीता दत्त यांनाही हवे तेव्हा आवाजातून मध आणि मद्य एकाच वेळी ओतता येत होते, हे या गाण्यात कळते. शकील बदायुनी यांनी गाण्यासाठी मुद्दाम निवडलेली हिंदीची बोली भाषा, तर कानांचे पारणे फेडते. श्रोत्याला अगदी त्याच मूडमध्ये लीलया घेऊन जाते.

पिया ऐसो जियामें समाय गयो रे,
कि मैं तनमनकी सुधबुध गवाँ बैठी…
हर आहटपे समझी वो आय गयो रे
झट घूँघटमें मुखड़ा छुपा बैठी
पिया ऐसो जियामें…

किती लोभस चित्र उभे राहते! तो येणार म्हणताच सगळे भावविश्व त्याच्याच विचाराने व्यापून गेले आहे. अगदी देहभान हरपायची वेळ आली आहे. जराशी कसली चाहूल लागली की तिला वाटते तेच आलेत. अन् ती लाजून झटकन डोक्यावर पदर घेते.

आजच्या धीट, काहीशा शुष्क आणि बराचशा शारीर प्रणय-व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर हे चित्र जरी कालबाह्य वाटले तरी जुन्याकाळी पती-पत्नीच्या प्रेमातील अशी ही नवलाईची ताजेतवानी भावना, हे मधुर गूढपण मोठी मजा आणत असे.

मोरे अंगनामें जब पुरवय्या चली,
मोरे द्वारेकी खुल गई किवाड़ियां,
ओ दैया! द्वारेकी खुल गई किवाड़ियां,
मैने जाना कि आ गये सांवरिया मोरे,
झट फूलनकी सेजियापे जा बैठी
पिया ऐसो जियामें समाय गयो रे …

केवढी लगबग सुरू आहे प्रियेची! ती म्हणते, ‘अंगणात जोराची झुळूक आली आणि माझ्या घराचे दार आपोआप उघडले. मला वाटलेच होते ‘ते’ येणार आणि ते आलेच. मग काय त्यांचे मन मोहविण्यासाठी मी आधीच फुलांनी सजवून ठेवलेल्या शय्येवरच जाऊन बसले बाई!

मैने सिंदूरसे माँग अपनी भरी,
रूप सैयाँके कारण सजाया,
ओ मैने सैयाँके कारण सजाया,
इस दरसे किसीकी नज़र न लगे,
झट नैननमें कजरा लगा बैठी.
पिया ऐसो जियामें समाय गयो रे …

प्रेम, प्रणय या भावना अगदी खासगी असण्याचा तो काळ! त्यामुळे कुलीन स्त्री शृंगार करायची तो फक्त पतीसाठी! सतत मेकअप लावून ‘तयार राहायची’ आधुनिक रूढी तोवर पडलेली नव्हती! त्यामुळे ‘ते’ येणार म्हणून मी त्यांचा नावाचे कुंकू लावले, त्यांचे मन माझ्याकडे वळावे म्हणून सगळे रूप सजवले. त्यात आता माझ्या सुखाला कुणाची नजर लागू नये म्हणून मी डोळ्यांत काजळही घातले आहे’ असे ती म्हणते.

हे गाणे म्हणजे एका प्रणयोत्सुक सुंदरीचे लाजरेबुजरे आत्मगुंजन आहे. एक मुग्धमधुर अनुभव. एका प्रसंगाचे संयत, गोड, हळुवार सेलिब्रेशन! जशी पहाटे-पहाटे गुलाबाची एखादी पानाआडची कळी हळुवारपणे एकेक पाकळी उघडत उमलावी, तसे नुसत्या जगण्यातही हे रमणे! ते आवडत असेल, तर अशा गाण्यांना आणि यूट्यूबला पर्याय नाही, म्हणूनच तर हा नॉस्टॅल्जिया!

Recent Posts

Bandra Linking Road : वांद्रे येथील क्रोमा शो रूममध्ये अग्नितांडव

मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…

30 minutes ago

कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, ज्यांच्याकडे आहे मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी…

1 hour ago

Nitesh Rane : किनारपट्टीवरील कोळी बांधवांची घरे कायमस्वरूपी करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची मागणी मुंबई : किनारपट्टीवर राहत असलेल्या मच्छीमार समाजावर…

1 hour ago

सैन्य दलांत तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत.…

2 hours ago

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावले खडे बोल, संयुक्त राष्ट्रांमध्ये घेतली हजेरी

संयुक्त राष्ट्रे : अमेरिका, ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी मागील तीन दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे घाणेरडे काम…

4 hours ago

DC vs KKR, IPL 2025: दिल्लीला विजय आवश्यक

मुंबई(ज्ञानेश सावंत):अठराव्या हंगामातील पात्रता फेरीतील चढाओढ सध्या सुरू आहे. प्रत्येक संघ पात्रता फेरीतील आपले स्थान…

4 hours ago