Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाजप्रसिद्धीच्या उंबरठ्यावर...

प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर…

हर्षदा आणि निखिल वाघ ही देखणी जोडी सोशल मीडियावर सध्या रिल्सच्या माध्यमातून गाजते आहे. लॉकडाऊनमध्ये करमणूक म्हणून सुरू केलेल्या रिल्सनी आज त्यांना प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवले आहे.

प्रियानी पाटील

हसण्याने आयुष्य वाढतं म्हणतात. हसा आणि हसवत राहा. हे हसणं फार सोपं असतं, पण दुसऱ्याला हसवणं तितकंच कठीण. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी मनोरंजनाचा भाग म्हणून युट्यूब, टीकटॉकच्या माध्यमातून एक सवडीतून आवड निर्माण केली. काहींसाठी हे क्षेत्र तात्पुरतं प्रसिद्धी देणारं ठरलं, तर काहीजणांनी प्रसिद्धीचा उंबरठा ओलांडला अक्षरश: म्हणजे टाइमपास म्हणून केलेले व्हीडिओ, रिल्सला रसिकांचा इतका प्रतिसाद मिळाला की, व्ह्युअर्स, लाईक, कमेंट्सचा अगदी वर्षाव झाला आणि या सहज म्हणून व्हीडिओ बनविणाऱ्या या व्यक्ती आज सोशल मीडियावरील स्टार्सच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या.

हर्षदा वाघ आणि निखिल वाघ ही देखणी जोडी सोशल मीडियावर जेव्हा एखाद्या कॉमेडीतून आपल्याला क्षणभराचा मनमुराद आनंद देते, तेव्हा त्यांचे संवाद, हावभाव, एक-दोन मिनिटांचा क्षण नकळतच आपल्या चेहऱ्यावर हसू खुलवतो. दु:खाच्या, कठीण प्रसंगात, टेन्शनच्या दुनियेत एक-दोन मिनिटं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू खुलवणं किती सोपं वाटत असलं, तरी त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत ही तेवढीच विचार करायला लावणारी आहे.

जुईनगर स्टेशनला उतरताना हा ओळखीचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला आणि न राहावून तिला थांबवलं. अगदी साधीशी, ना चेहऱ्यावर मेकअप, ना कोणता श्रुंगार, काहीशी थकलेली आणि जॉबवरून घरी परतणारी हर्षदा मी जेव्हा पाहिली तेव्हा यामागचे कष्ट, मेहनत आणि वेळात वेळ काढून रिल्स, व्हीडिओ बनवताना कशी मेहनत घ्यावी लागते याचा प्रत्यय आला.

हर्षदा सांगते, रिल्सची सुरुवात ही सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी केलीच नव्हती. लॉकडाऊन लागल्यावर एक करमणूक म्हणून ही सुरुवात केली आणि सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत एक व्हीडिओ इतका व्हायरल झाला की, त्याचे व्ह्युवज मिलीयन्समध्ये गेले. यावेळी नातेवाइक, मित्रमंडळींतूनही चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला टीकटॉकच्या माध्यमातून व्हीडिओ सुरू केल्याचे हर्षदाने सांगितले. पण जसे हे व्हीडिओ व्हायरल होऊन प्रसिद्धी मिळू लागली तसं टीकटॉक बंद झालं आणि मग आपण इन्स्टाग्रामवर रिल्स बनवू लागलो आणि तिथेही आपल्याला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याचे हर्षदाने सांगितले.

रिल्स, व्हीडिओ बनवताना बरीच मेहनतही घ्यावी लागते. १५ सेकंदाचा व्हीडिओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो, पण त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत असल्याचे ती सांगते. कन्टेंट क्रिएट करण्यापासून, व्हीडिओ शूट करणे, तो एडिट करणे, योग्यवेळी तो व्हीडिओ अकाऊंटवर पोस्ट करणे, या साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. व्हीडिओ बनविण्यासाठी शांततेची गरज असते. बॅगराऊंड साऊंडमुळे व्हीडिओवर अनेकदा परिणाम होतो आणि वारंवार त्यावर मेहनत घ्यावी लागत असल्याचे हर्षदा सांगते.

जास्तीत जास्त रिल्स हे घरीच शूट होत असून अनेकदा हे शूट सासुबाई करतात, असेही ती म्हणाली. तर कन्टेंट शोधणे, शूटचे अँगल, एडिटिंग आणि आपली सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स ही हर्षदाचे पती निखिल वाघ सांभाळतात, असे हर्षदाने सांगितले. आपल्या कला, गुण कौशल्याचे क्रेडिट हर्षदा पती निखिलला देते.

सोशल मीडियावर एवढं ठळकपणे येणं म्हणजे जरा अवघडल्यासारखंच. काय म्हणतील लोक? ही साशंकता मनात होतीच. सुरुवातीला हे व्हीडिओ, रिल्स करताना आपल्याला थोडे अवघड गेले. कारण मुळात अॅक्टिंग वगैरे कधी केलीच नव्हती. मग लोक काय म्हणतील, जे आपल्याला ओळखतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, असे विचारही डोकावले. पण नवरा व घरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि मग हळूहळू अभिनय, रीडिंग, हावभाव आदीतून पुढे आलो. त्यातच धनंजय पवार यांसारखी पॉप्युलर क्रिएटर असलेली मोठी माणसे जोडली गेली. त्यांनी आपल्याला खूप चांगले गाईड केल्याचे हर्षदाने सांगितले.

घरच्यांच्या सपोर्टमुळे आपली ओळख आहे. हर्षदा स्वत: लॅब टेक्निशियन आहे. रोजच्या रुटीनमधून दोन-तीन तास वेळ काढून युट्यूबसाठी कन्टेंट बनवून ठेवले जातात. कधी कंटाळा केला, तर सासुबाई पुढाकार घेतात. ‘आज व्हीडिओ बनवायचे नाहीत का?’ घरातूनच फुल्ल सपोर्ट असल्यामुळे हे क्षेत्र समाधान देऊन जाते, असे हर्षदा सांगते.

बाहेर जेव्हा लोकं भेटतात, विचारपूस करतात तेव्हा फार छान वाटते. एखादे सेलिब्रिटी असल्यासारखे वाटते. हर्षदा निखिलची जोडी छान वाटते. आपले व्हीडिओ लोकांना आवडतात, याचे फार समाधान वाटते. अधिक प्रोत्साहन मिळते, असे ती म्हणाली.

खरं तर सोशल मीडिया चांगले की वाईट हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. केवळ मनोरंजन आणि शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण त्याला किती वेळ द्यायचा यावर आपला कंट्रोल असला पाहिजे. आपल्या व्हीडिओला जशा चांगल्या कमेंट येतात तशा कधी कधी नकारात्मक कमेंट्सचाही सामना करावा लागतो. काही सजेस्ट करणाऱ्या कमेंट असतील, आणि आपल्याला पटले तर आपण पुढील व्हीडिओत जमेल तसे चेंजेस करत असल्याचे हर्षदाने सांगितले.

खरं तर रिल्स बनवणे हे एकट्याचे काम नाही. जशी मेहनत महत्त्वाची तशी माणसंही. यावेळी आपल्याला सासुबाई, नणंदा, आपल्या मैत्रिणी, भाऊ आणि कॅरेक्टरमधील भाऊ सचिन यांची खूप मदत मिळत असल्याचे ती सांगते. हे सारे कॅरेक्टरप्रमाणे रोलही करतात. त्यांचा खूप सपोर्ट मिळत असल्याचे हर्षदाने सांगितले. दरम्यान एकंदर या रिल्समुळे ती ओळख मिळाली. लोकांचा प्रतिसाद पाहून आपल्याला एकदम मस्त वाटते. हुरूप येतो. लोकांच्या चेहऱ्यावर येणारे हसू पाहून समाधान मिळून जाते. इथे घरच्यांची साथ, जनतेचे प्रेम, कमेंट्स मिळतात आणि आपल्यालाही या क्षेत्रात मनोरंजनासोबतच एक आनंदाचा क्षण मिळतो, याचे फार समाधान असल्याचे हर्षदाने सांगितले.

priyanip4@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -