सावंतवाडी (प्रतिनिधी) : आम्हीच स्थापन केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनमध्ये आम्हालाच कागदोपत्री मृत दाखवण्यात आले. हे मोठे धाडस असून जिवंतपणी मृत दाखवणे हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी हे प्रकरण शेवटपर्यंत लावून धरणार तसेच ते लवकरच याबाबत कबड्डी फेडरेशनचे राष्ट्रीय पदाधिकारी अजित पवार यांची भेट घेऊन सिंधुदुर्गची कार्यकारिणी तत्काळ बरखास्त करण्याची मागणी करणार आहे, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनी दिला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
क्रीडाक्षेत्रात काम करणाऱ्या वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांना संघटनेतून बाहेर करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनमधील त्यांचे आजीवन सभासदत्व रद्द करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे हे पद रद्द करताना अध्यक्ष व कार्यवाहकांनी केसरकर जिवंत असतानाच त्यांना मृत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तांकडे जमा केल्याचा आरोप अण्णा केसरकर यांनी केला असून याबाबत केसरकर यांनी पोलिसांत तक्रार दिली असल्याची माहिती दिली.
सावंतवाडी जिमखाना येथे १९८३ साली सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व कबड्डीच्या प्रसारासाठी हे फेडरेशन निर्माण झाले. यावेळी जिल्ह्यातील तज्ज्ञ मंडळी यात होती. पण त्यातील काहींचा मृत्यू झाल्यानंतर हे फेडरेशन युवकांच्या हाती आले.
या काळात काही चुकीचे प्रकार घडले. असे असतानाही अलीकडेच या फेडरेशनची माहिती घेतली असता चक्क फेडरेशनचे अध्यक्ष व कार्यवाहकांनी अण्णा केसरकर यांना जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे धर्मादाय आयुक्तकांडे जमा केली अन् त्यांचे नाव सदस्य यादीतून कमी केले.
विशेष म्हणजे या कार्यकारणीला धर्मादाय आयुक्तांनी मंजुरी देऊन सिंधुदुर्ग न्यायालयाची फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्याची मागणी केसरकर यांनी केली आहे. तसेच सावंतवाडी पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली आहे.यावेळी प्रसाद अरविंदेकर, नंदन वेंगुर्लेकर, जितेंद्र म्हापसेकर, आर. डी. बांदेकर, विकी केरकर, एस. ए. लाखे, हनुमंत कारीवडेकर, नरेंद्र मुळीक आदी उपस्थित होते.