Thursday, July 10, 2025

कोलकाताला लोळवून लखनऊचा अग्रस्थानी होल्डर

कोलकाताला लोळवून लखनऊचा अग्रस्थानी होल्डर

पुणे (वृत्तसंस्था) : गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर सांघिक कामगिरी केल्यावर विजय कसा सोपा होता याचा वस्तुपाठ लखनऊने शनिवारी घालून दिला. मोहसीन खान, दुष्मंता चमीरा, आवेश खान आणि जेसन होल्डर यांची बळी मिळवत धावा रोखणारी गोलंदाजी तर दुसरीकडे क्विंटॉन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनीस यांची प्रभावी फलंदाजी अशा सांघिक कामगिरीच्या जोरावर लखनऊने कोलकाताला ७५ धावांनी पराभूत करत यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा विजय साकारला. या विजयामुळे लखनऊने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरून अग्रस्थानी झेप घेतली आहे.


कोलकाताच्या फलंदाजांची आघाडीची फळी पत्त्यासारखी कोसळली. अवघ्या ६९ धावांवर त्यांचे ५ फलंदाज तंबूत परतले होते. आंद्रे रसेल आणि सुनील नरिन यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न तोकडा पडला. रसेलने १९ चेंडूंत ४५ धावांची अफलातून फलंदाजी करत कोलकाताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. नरिनने १२ चेंडूंत २२ धावांची खेळी केली.


विंडीजचे हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर कोलकाताला पुन्हा गळती लागली आणि विजय त्यांच्यापासून दूरच गेला. लखनऊचा मोहसीन खान, दुष्मंता चमीरा, आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी सांघिक गोलंदाजी करत कोलकाताला मान वर करू दिली नाही. त्यामुळे कोलकाताचा संघ १५ व्या षटकात १०१ धावांवर सर्वबाद झाला.


तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या लखनऊच्या क्वींटॉन डी कॉक आणि दीपक हुडा या आघाडीच्या फलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत धावा गोळा केल्या क्वींटॉन डी कॉकने २९ चेंडूंत ५० धावा केल्या, तर दीपक हुडाने २७ चेंडूंत ४१ धावांची कामगिरी केली. शेवटच्या षटकांमध्ये मार्कस स्टॉयनीस आणि जेसन होल्डरने तुफानी फलंदाजी करत लखनऊला २० षटकांत १७६ धावांपर्यंत मजल मारून दिली.

Comments
Add Comment