Tuesday, October 8, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेसायकलिंग आणि चालण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील मार्गिका खुली

सायकलिंग आणि चालण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील मार्गिका खुली

डॉ. सूर्यवंशी यांची माय सिटी, फिट सिटी संकल्पना

कल्याण (वार्ताहर) : माय सिटी, फिट सिटी या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कल्याण रिंग रोडवरील गांधारे ब्रिज ते बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डोंबिवली येथील पत्रीपूल ते ९० फुटी ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्ता हे दोन रस्ते शनिवारपासून सकाळी ५ ते ८ या वेळेत महापालिका परिसरातील नागरिकांसाठी केवळ सायकलिंग आणि चालण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहेत.

या वेळेत या दोन्ही रस्त्यांवरील एका बाजूची सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. माय सिटी फिट सिटी ही संकल्पना नागरिकांच्या सहकार्याने राबविण्याचे ठरविले असून विशेषत: कल्याण व डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एक रस्ता सकाळी ५ ते ८ या वेळेत सायकलिंग आणि चालण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सायकलिंग आणि चालताना वाहनांची ये-जा चालू असल्यास सातत्याने एक प्रकारचे मानसिक दडपण राहते, त्यामुळे हे रस्ते सकाळच्या वेळेत राखीव ठेवले आहेत. नागरिकांच्या सूचनेनुसार व आवश्यकतेनुसार वाहतूक पोलिसांच्या मदतीने आणखी काही रस्ते यासाठी राखीव ठेवले जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी सकाळी ९० फुटी ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावर बोलताना दिली.

नागरिकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा उद्देशाने महापालिकेने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे, असे मत यावेळी उपस्थित सायकलपटूंनी व्यक्त केले.

या उपक्रमावेळी पहाटे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचेसह त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सत्यवान उबाळे, सचिव संजय जाधव, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, अतुल पाटील, स्वाती देशपांडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता व्ही. एस. पाटील, रोहिणी लोकरे, प्रशांत भागवत, वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश गीते उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -