मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जनतेतून निवडणूक लढवून दाखवावी. मी त्यांच्या विरोधात उभी राहिन आणि जनता मला विजयी करेल, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले. लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या बोलत होत्या.
यावेळी राणा म्हणाल्या की, देवाचे नाव घेणे, राम-हनुमंताची भक्ती करणे हा गुन्हा आहे काय? जर हा अपराध असेल तर १४ दिवस नव्हे १४ वर्ष जेलमध्ये राहण्याची तयारी आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था नसून दडपशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राणा यांना २० फूट खड्ड्यात गाडण्याचे वक्तव्य केल्याबद्दल संजय राऊत यांच्या विरोधात दिल्लीत तक्रार देणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख पोपट असा केला. तसेच राज्यातील सत्तेच्या गैरवापराविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार असल्याचे राणा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी थेट आव्हान दिलेय. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असे राणा म्हणाल्या आहेत. एवढेच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले आहे.
कारागृहात योग्य वागणूक न मिळाल्याने प्रकृती बिघडल्याचा आरोप नवनीत राणांनी केला आहे. अनेक भाजप नेत्यांनी रुग्णालयात जाऊन नवनीत राणांची भेट घेतली. काल (शनिवारी) देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी देखील नवनीत राणांची लीलावती रुग्णालयात भेट घेतली. आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ज्या प्रकरणी राणांना अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणावर माध्यमांशी बोलण्यास कोर्टाने मनाई केली आहे. याच अटीवर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.