डॉ. स्वप्नजा मोहिते
बायका… उठतात पहाटेच्या पहिल्या किरणाला…. सवयीने चालतात त्यांचे हात… रांधा, वाढा, उष्टी काढा…. गर्भवेणा देतानाही चालत राहत त्यांच्या मेंदूतील घड्याळ… किचन टू हॉल आणि त्याबाहेरचं जग ओलांडून परत सीमेत परतणं… करत राहतात त्या, हा अखंड प्रवास… कपाळावरल्या टिकलीच्या तळ्यात गुदमरून ही राहतात जगत बायका!
माझं लक्ष घरासमोरच्या मैदानात अडकलं आहे. पालं ठोकून कोणी फिरस्ते उतरलेत तिथं. ताडपत्री ताणून बसवली गेलीत. दोन-चार शेळ्या, काही गाढवं आणि त्यांच्यामध्ये लुडबूडत बसलेली काही चिल्ली-पिल्ली! कपाळावर आलेल्या झिपऱ्या सावरत, त्यातली एकजण माळरानावरल्या काड्या-काटक्या गोळा करतेय. वयानं असेल दहा-पंधरा वर्षांची! कडेवर एक तान्हसं बाळ सांभाळत, ती सरपण जमवतेय. पालाच्या मागल्या बाजूला तीन दगडांची चूल पेटली आहे. काळ्या सावळ्या रंगाची ती……. बहुधा तिची आई असावी…… फुंकणीनं फुंकत विस्तव पेटवत आहे. जर्मनच्या भगुण्यात काहीबाही मांडून ठेवलंय तिच्या भोवताली. “अगं, अटोप की! किती वखुत लावतीस चूल पेटवायला? कवाधरनं सांगतू या……. भूक लागली म्हनुन!” पालाच्या दोऱ्या ताणत तो…… तिचा नवरा असावा…… करवादतोय. “आता काय माजी हाडं घालू चूल पेटवायला? वली लाकड……. पेटत्याल तवा खरं!” ती वैतागून बोलली. ओल्या लाकडांचा धूर, त्या दंव-भिजल्या माळरानावर तरंगत होता. पहाटेच्या कोणत्या प्रहराला उतरले हे इथे येऊन? कुठून आले कोण जाणे! मी तिचा विस्तवाच्या धगीनं लालसर झालेला चेहरा न्याहाळतेय. पेटल्या चुलीवर कुठलसं पातेल ठेवत ती उठली. गाठोड्यात बांधून ठेवलेला इवलासा बिस्किटाचा पुडा काढून पोरांच्या हातावर एक एक बिस्कीट ठेवत, ती बादली घेऊन पाण्याच्या शोधाकडे वळली. तेव्हापासून तिला न्याहळायचा छंदच जडलाय मला! तिच्यात मला, माझ्या आसपासच्या बायकांचं प्रतिबिंब दिसतंय. पायाला भिंगरी लावून कामं उरकत जायचं. रांधा… वाढा… उष्टी काढा! मध्येच पोरांची भांडणं जुंपतात…. पाला-पालातून कर्कश्य आवाज उमटतात… तेव्हा कोणाच्या तरी पाठीत धपाटा घालून, कोणाला तरी पोटाशी घेत, ती ही आघाडीही सांभाळतेय. तान्हं पोर पदराखाली घेत, ती चुलीजवळ विसावते मध्येच! बाजूला खाटेवर तिचा नवरा पाय पसरून झोपलाय. बिडीचा झुरका घेत, मध्येच तो आभाळाकडे एकटक पाहत बसतो. बऱ्याच वेळा तो झोपडीतून गायब असतो. येतो तेव्हा त्याचे पाय थाऱ्यावर नसतात. तेव्हा त्याचा हात तिच्या अंगावर उगारला जातो…. तिच्या रडण्याचा, कण्हण्याचा आवाज माळरानावर तेव्हा रेंगाळत राहतो बराच वेळ! तरी ही ती सकाळी उठतेच. कण्हत कुथंत चूल पेटवत, खुडबुडत राहते आणि परत तोच दिवस पुढे चालू राहतो. जिंदगी का पल सूरज को थामे………गुजरता रहता हैं……, सर्द स्याही सी रात के चादर तले……. सूरज चूप सा हो जाता है, तब…… कौन से किनारे से युं सिसकियां उभरती हैं? कौन से पलकों तले तब…….. अँधेरा रुक जाता हैं? पेटलेल्या विस्तवाच्या ज्वाळा रात्रीच्या अंधारात चित्रविचित्र आकार घेत, नाचत राहतात. तेव्हा तिच्या रडण्याला त्या अंधाराचा गंध येतो. माझ्या सभोवतालच्या बायकांच्या मनात कोंडलेल्या भावनांचा अस्पष्ट स्वर तेव्हा मला जाणवतो.
तोच रोजचा दिवस. तेच रोजचे जगणे! या पहाटेपासून त्या रात्रीपर्यंत! मुकाट्याने जगत राहणे! बायका……… जमवून घेतात विस्तवाशी…. धारदार विळीच्या पात्याशी……. नदीच्या वाहत्या प्रवाहाशी……. खोल विहिरीच्या तळाशीही! लोकलच्या धावत्या वेगाशीही घेतातच त्या जुळवून…… भाजणं…, कापणं, पडणं झडणं.…….. अंगवळणी पडलेलं सारं…. जन्मापासूनच! पुरुष मांडतो पौरुषत्वाचा खेळ तेव्हा मात्र, जखमा जिव्हारी लागत जातात…. …रोज मरत जातात बायका!! हे रोज मरत जाणं…..…. गृहीत धरलं जाणं! आता हेच जगणं झालंय! शफक तक अब कोई सिसकी नहीं उठती …मन की गहराई अब किसी को छू नहीं जाती……..…. मौत तो रोज घुमती फिरती हैं यहा…… लाश की परछाई उठाये नहीं उठती!! खामोश हैं सितारे, चूप हैं अँधेरा भी……… मर गये हम, पर पलके गिली नहीं होती!!!
आज तिच्या पालात शांतता आहे. आज चूल पेटली नाहीये. मेंढ्यांच्या समोर आज हिरवा चारा पडला नाहीये. चिल्ली-पिल्लं चिडीचूप आहेत. चिरगुटात गुरफटून ती पडून आहे कोपऱ्यात. ती तिच्या नेहमीच्याच जागी बसलीय…… चुलीसमोर…. न पेटवलेल्या चुलीसमोर. आज धग तिच्या मनात धगधगत आहे. चेहऱ्यावर त्या धगीचं प्रतिबिंब उमटलेलं स्पष्ट दिसतंय मला. तिची लेक, तिच्या कुशीत मान खुपसून पडली आहे.
तिच्या नवऱ्याचा मागमूस नाहीये आज पालात. “मसणात जाऊ दे.… किडे पडो त्याच्या….!” अवेगानं तिचा ऊर धपापतोय. “मेल्यानं पोरीला इकन्याचा घाट घातला व्हता……. सोताच्या लेकीला…… आरं हाड तुज्या….!” बोलता बोलता ती पोरीला घट्ट कवटाळून घेते उराशी. तिच्या डोळ्यांत आग पेटलीय.…. मला ती इथे ही जाणवतेय. “म्या काय बी सहन करनं…, पण गिऱ्हाईक घिऊन आला ह्यो बाप आपल्याच लेकीसाठी…. आय हाय म्या…. चुलीतलं पेटतं लाकुडच घातलं डोस्क्यात त्याच्या! बायच्या जातीनं काय बी सहन करावं?” तिच्या कपाळावरची शीर ताडताड उडतेय. आज ती रडणार नाहीये…. मला खात्री आहे. इतके दिवस मनावर दाबून बसवलेलं झाकण आज उघडलय. कपाळावर लावलेल्या कुंकवाच्या परिघाबाहेर पडलीय ती…. तिच्या लेकीसाठी! आम्ही कधी ओलांडणार आहोत हा परिघ? आपल्या मनानचं आखून घेतलय आमचं रिंगण. खुंट की मिरची…… जाशील कशी? मनाभोवतीचे फेरे आणखीनच घट्ट होत जातात दिवसागणिक. मनावरचे ओरखडे आणखीनच
खोल जखमांमध्ये बदलत जातात. रांधा… वाढा…उष्टी काढा…..चूल आणि मूल सांभाळा….. यू आर आल्वेज टेकन फॉर ग्रांटेड! शरीर तुझं……माझी मालमत्ता! मन? व्हॉट इज इट? तुला असलच हे मन, तर काढून टाक ते शरीराबाहेर…. नाहीतर गाडून टाक खोल कुठेतरी! इट्स ऑफ नो युज हियर. आणि ते मनात भावना बिवना कोंडून टाकणं? इट्स ऑल हबंग! रोज सकाळ होईल आणि रोज तेच ते….. रांधा……वाढा…. उष्टी काढा!
बायका सहन करतच जातात…. का? मी वाट पाहतेय…… ते मनावरचं झाकण उसवून उडून जाण्याची! कोंडलेली वाफ कधीतरी उसळेलच! त्यावेळी रिंगणात अडकलेली ती, परिघाबाहेर असेल. वर्तुळाची मर्यादा असली तरी तिला जाणवेल तिचं स्वतःच असलेलं आस्तित्व………. वर्तुळाच्या केंद्रबिंदूगत! ते इतरांनाही जेव्हा जाणवेल तो असेल खरा तिचा दिवस!
बायका…. राहतात फिरत
आपल्याच परिघात
लालचुटुक रंगाचं लेण पांघरून
कोणीही यावं, टिचकी मारून जावं
जखमांची नक्षी मनभर कोरून जावं
हे कधीतरी थांबायला हवं
तिच्या मनातल आभाळ मात्र