अनघा निकम-मगदूम
कोकणचा रस्ता आडवळणाचा, घाटांचा, दऱ्या खोऱ्यांचा! निसर्ग आपल्या कवेत घेऊन कोकण आपलं वैभव उधळत दिमाखात उभा आहे. पावसात हे सौंदर्य अधिकच खुलतं. कोकणचा जसा समुद्रकिनारा, छोट्या छोट्या नद्या, खाड्या, सह्याद्रीचे दरी डोंगर तसेच इथले घाटरस्तेसुद्धा तितक्याच नखऱ्यात या कोकणात ठिकठिकाणी दिसतात. पण या घाटाना गेल्या काही वर्षांपासून दरडी कोसळण्याचे ग्रहण लागले आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळून हे घाट बंद होतात आणि मोठी समस्या निर्माण होते.
यंदा चिपळुणातील परशुराम घाटाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी हा मार्ग दिवसातील काही तास बंद ठेवण्यात येतो. इथली वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येते. याच निमित्ताने कोकणातील घाट रस्त्यांची अवस्था डोळ्यांसमोर उभी राहते.
संपूर्ण कोकणाचा संपर्क हा घाट रस्त्यांशी निगडित आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून हलक्या आणि जड वाहनांची वाहतूक २४ तास सुरू असते. रेल्वे आणि हवाई वाहतूक कोकणात विकसित झाली तरीही हा वाहतुकीचा पर्याय कधीच बंद होणार नाही. या महामार्गावरून दर मिनिटाला किमान आठ ते दहा गाड्या ये-जा करीत असतात. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील भरणा नाका (खेड) आणि चिपळूण या दरम्यान भोस्ते किंवा परशुराम घाटात एखादा अपघात झाला किंवा पावसाळ्यात दरड कोसळली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी जोडले गेलेले आहे. पावसाळ्यामध्ये हे चारही घाटरस्ते अत्यंत धोकादायक बनतात. पोलादपूर (जि. रायगड) आणि महाबळेश्वरला (जि. सातारा) जोडणारा आंबेनळी घाट किंवा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हे सुद्धा पावसाळ्यात धोकादायक म्हणूनच ओळखले जातात. रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग ताम्हाणी घाटातून जातो.
गेल्या काही वर्षांपासून दर पावसाळ्यात एकदा तरी या प्रत्येक घाटात दरडी कोसळतात आणि वाहतूक ठप्प होते. अपघात होतात. त्यातच सन २०१४ पासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या भागात अनेक भौगोलिक बदल झालेले आहेत. डोंगर कापले गेले आहेत, पाण्याचे प्रवाह बदलले आहेत, याचाही परिणाम आता दिसू लागला आहे. गेले दोन पावसाळे हे घाट अधिक धोकादायक झाले आहेत. अशावेळी केवळ तात्पुरती डागडुगी किंवा उपाय करण्यापेक्षा या घाटरस्त्यांना पर्यायी रस्त्यांचा विचार करणे आणि पावसाळ्यामध्ये ते सुसज्ज ठेवणे आता अधिक निकडीचे झाले आहे.
यासाठी व्यापक विचार होणे गरजेचे आहे. या घाटांची दुरुस्ती किंवा रुंदीकरण करताना केवळ अभियांत्रिकी कौशल्यच नव्हे, तर भौगोलिक, वैज्ञानिक दृष्टीनेसुद्धा अभ्यास होणे गरजेचे आहे. कोकणात भौगोलिक दृष्ट्या अनेक बदल होत आहेत. दरवर्षी संकट अधिक गडद होताना दिसतंय. मानवनिर्मित चुका किंवा बदल याला जसे कारणीभूत आहेत तसेच नैसर्गिक बदलसुद्धा आहेत. तेव्हा घाटासाठी सर्व पर्यायांचा विचार होणे आवश्यक आहे.