रमेश तांबे
एक होती बाग, बागेत होती फुले. वेगवेगळ्या रंगाची, निरनिराळ्या गंधाची. बागेत फुलपाखरे यायची. चतुर, भुंगे यायचे अन् मिळून सारे धमाल करायचे. बागेच्या एका कोपऱ्यात एक गुलाबाचं झाड होतं. लालभडक गुलाब वाऱ्यावर डुलायचा. खूप छान वास त्याचा वाऱ्यावर पसरायचा. त्या गुलाबाच्या फुलाचा एक होता खास मित्र. नाव त्याचं सूर्यफूल. तळहाताएवढे भले मोठे फूल. पिवळ्याधमक पाकळ्या दिसे जणू सूर्य!
गुलाब आणि सूर्यफुलाची गाढ होती दोस्ती, वाऱ्यावर स्वार होऊन करायचे मस्ती. नाचायचे, डुलायचे, धमाल करायचे. फुलपाखरे, चतुरांसोबत खेळ खेळायचे. सूर्यफुलाला होतं माहीत गुलाबाच्या अंगावर काट्यांची गर्दी, जो कुणी त्रास देईल त्याला अद्दल घडेल चांगली. गुलाबाला माहीत होतं, सूर्यफुलाचं सूर्याशी नातं! ज्या दिवशी सूर्य ढगाआड जातो, तेव्हा सूर्यफूल कोमेजून जातं. तेव्हा गुलाब हसवतो, खेळवतो सूर्यफुलाला!
अशी मैत्री नव्हती बागेत कुणाची. साऱ्यांना हेवा वाटायचा दोघांचा. बागेतली फुले आपापसात बोलायची ‘मैत्री असावी, तर अशी.’ पण बागेतल्या काहींना सहन नाही झाली त्यांची ही जगावेगळी मैत्री. ठरविले त्यांनी कान भरायचे एकाचे, दोस्तीला त्यांच्या तडे द्यायचे! मग फुलांच्या टोळक्याने बोलावले एका फुलपाखराला, सांगितले कानात, “फोड दोघांच्या मैत्रीला.” फुलपाखरू म्हणाले, “मला नाही जमणार, असे वाईट काम मी नाही करणार.” मग फुलांच्या टोळक्याने, बोलावले चतुराला. सांगितले कानात, “फोड त्यांच्या मैत्रीला.” चतुर म्हणाला, “हो हो आता जातो.” मग उडत उडत चतुर गेला गुलाबाच्या जवळ अन् फाडून घेतले आपले नाजूक पंख. पण फुलांच्या टोळक्याने आपला सोडला नाही हट्ट, गुलाब अन् सूर्यफुलाच्या मैत्रीत पाडायची होती फूट! मग फुलांच्या टोळक्याने बोलावले एका भुंग्याला. गूं गूं गूं करीत आला भुंगा. टोळक्यातले एक फूल म्हणाले, “अरे भुंग्या त्या कोपऱ्यातल्या सूर्यफुलाला जाऊन सांग की, गुलाब म्हणतो मीच आहे सर्वात श्रेष्ठ! सूर्यफूल आहे एकदम कनिष्ठ! काय तर म्हणे सूर्याकडे बघतो. रंग नाही धडाचा की गंध नाही चांगला. जगात आहे मलाच मान, सूर्यफुलाची असते सदा खाली मान. मला पाहून लोक हसतात. मला घेऊन सगळीकडे मिरवतात. सूर्यफुलाचं म्हणे तेल काढतात. मी खिशात अन् तू चरक्यात!”
भुंग्याकडून सारे ऐकताच सूर्यफूल दुःखी झाले, कष्टी झाले. त्याच्या डोळ्यांतून पाणी झरझर वाहिले. गुलाबाच्या मनात केवढा अहंकार, हा तर माझा केवढा अपमान! दुसऱ्या दिवशी पहाट झाली. सूर्यफुलाने मान उंचावली. इकडे तिकडे पाहत सूर्याकडे एकटक नजर लावली. गुलाबाने सूर्यफुलाला हाक मारली. पण एक नाही, दोन नाही. फुलपाखरे, चतुर, भुंगे मध खाऊन गेले. वाऱ्याच्या नाजूक झुल्यावर बसून गुलाबाचा वास आला बागेत फिरून. पण एवढ्या वेळात सूर्यफुलाने गुलाबाकडे ढुंकूनही पाहिले नाही. सूर्यफुलाला काय झाले गुलाबाला कळेना. अगं त्याचे दुखते आहे की, त्याला कोणी टोचून बोलले आहे. रोज खेळणारा, सतत हाका मारणारे सूर्यफूल आज बघतही नाही याचे गुलाबाला आश्चर्य वाटत होते. मग गुलाबाने “सूर्यफुला, सूर्यफुला” अशा हाका मारल्या. पण सूर्यफूल गुलाबाकडे बघेनाच!
गुलाबाला मात्र खूपच वाईट वाटले. कारण त्याच्या जीवलग मित्राने त्याची मैत्री नाकारली होती. गुलाबाने फुलपाखरांना विचारले, “सूर्यफुलाला काय झाले?” पण ते म्हणाले, “काय माहीत.” चतुरांनी तर कानावरच हात ठेवले. भुंग्यांना विचारताच ते कुत्सितपणे हसले अन् जाता जाता म्हणाले “तू स्वतःला जगात सर्व श्रेष्ठ समजतोस, असे सूर्यफुलाला वाटते.” गुलाबाच्या लगेच लक्षात आले. भुंग्यांनीच सूर्यफुलाचे कान भरवले असणार. आता गुलाबाला खूपच वाईट वाटले. गुलाब सूर्यफुलाला म्हणाला, “त्या भुंग्यांनी तुला खोटेच सांगितले. तू माझा जीवलग मित्र आहेस हेच अगदी खरे आहे. लोकांना आपली दोस्ती पाहवत नाही. म्हणूनच त्यांनी तुझे कान भरवले आहेत.” पण सूर्यफूल रागाने नुसता फणफणत होते. गुलाबाला कळून चुकले, आता यापुढे सूर्यफुलाशी मैत्री होणे नाही. गुलाबाने खूप प्रयत्न केले. पण त्यांच्या मैत्रीत बाधा आली ती कायमचीच. गुलाब खूप हळवा झाला. तो दुःखी, कष्टी झाला. त्याच्या शरीरातली ताकद कमी झाली. तेवढ्यात वाऱ्याची जोरदार झुळुक आली अन् गुलाबाचं झाड काडकन मोडून पडले. तसा गुलाब ओरडला, “मित्रा येतो रे, माझ्यावर रुसू नकोस, असा रागावू नको!”
गुलाबाचा अचानक झालेला मृत्यू सूर्यफुलाने पाहिला अन् तोही हमसून हमसून रडू लागला. म्हणाला, “मित्रा माफ कर. मला तुझी मैत्री ओळखता आली नाही. या खोटारड्या भुंग्यांचं मी ऐकलं अन् तुझ्याबद्दल वाईट मत बनवलं. तूच माझा खरा मित्र, ये ना परत माझ्या दोस्ता.” पण गुलाब मान तुटून लोंबकळत पडला होता. त्याच्याकडे बघत सूर्यफूल रडत होते. दुसऱ्याचे ऐकून आपण आपला चांगला मित्र गमावला, याचे सूर्यफुलाला खूप दुःख झाले. तेव्हापासून सूर्यफूल रात्रीच्या वेळी मान खाली घालून रडत बसते. आपल्या गुलाबी मित्राची त्याला रोज आठवण येते.