नागपूर (हिं.स.) : शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलू पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. नागपूरच्या मिहान, दहेगाव मौजा येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या स्थायी परिसराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान, महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुभाष देसाई, नितीन राऊत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, स्थानिक खासदार, आमदार आणि आयआयएम नागपूरचे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले की, अभ्यासक्रम हा आपल्याला आपले ध्येय, महत्वाकांक्षा याबाबत आत्मपरीक्षणाची संधी देत आपल्या स्वप्नांची पूर्तता करतो, असे राष्ट्रपती म्हणाले. नवोन्मेश आणि उद्योजकता यांना प्रशंसेची पावती देत प्रोत्साहन देणाऱ्या युगात आपण राहत आहोत. नवोन्मेश आणि उद्योजकता या दोन्हीतही, तंत्रज्ञानाद्वारे आपले जीवन अधिक सुकर करण्याची क्षमता तर आहेच त्याचबरोबर अनेकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याचेही सामर्थ्य आहे. आयआयएम नागपूर येथील परिसंस्था, रोजगार मागणारे ऐवजी रोजगार पुरवणारे होण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयआयएम नागपूर हे केवळ शैक्षणिक केंद्रच नाही तर जीवन घडवणारे केंद्र ठरेल. मला विश्वास आहे की, नागपूर आयआयएमचे वातावरण विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठीच नव्हे तर रोजगार देण्याइतके सक्षम बनवेल. नागपूर आयआयएम महिलांच्या प्रगतीसाठी देखील योगदान देईल. हेच सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई जोशी यांच्या भूमीला खरे नमन असेल. स्पेशल इकोनामिक झोनमध्ये असलेल्या नागपुरात आयआयएम सारखी संस्था असणे हे देशातील पहिले उदाहरण आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षांपूर्वी देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनुष्य बळ तयार करण्यासाठी आयआयएमची संख्या वाढविण्याचे निर्णय घेतले. महाराष्ट्रात आयआयएम नागपुरात करण्याचे ठरले. काहींनी वाद निर्माण केले की प्रस्ताव औरंगाबाद आणि नाशिकचे होते, मात्र प्रस्ताव फक्त नागपूरचा होता. लगेच कामाला सुरुवात झाली. दीडशे एकर जागा उपलब्ध करून दिली. पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आणि आज राष्ट्रपती त्याचे उद्घाटन करत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, त्याकडे आज एक पाऊल पडत आहे.. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची भागीदारी आयआयएम नागपूर सोबत असल्याने चांगले परिणाम आयआयएम नागपूर देईल असा विश्वास आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर आयआयएमसाठी राज्य शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, असं सुभाष देसाई म्हणाले.
भव्यदिव्य कॅम्पस
जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या नागपूरचे पहिले सत्र जुलै २०१५ पासून सुरु झाले होते. त्यावेळी स्वतःची इमारत नसल्याने विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेच्या म्हणजेचं (व्हीएनआयटी) येथील कॅम्पसमध्ये आयआयएमचे क्लासेस सुरू करण्यात आले होते. त्यानंतर मिहान परिसरात १३२ एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या ६६५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असून पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. १३२ एकरात विस्तारलेल्या इमारत व परिसरात ६६५ विद्यार्थी व्यवस्थापन विषयाच्या विविध शाखेमध्ये शिक्षण घेत असून या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या असून अद्यावत प्रशिक्षण यंत्रसामग्रीने सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार आहे. २०१५ ला सुरु झालेल्या या संस्थेला आता या नव्या कॅम्पसमुळे नवी झळाळी मिळाली आहे.
अत्याधुनिक क्लास रूम्स : आयआयएम नागपूर येथे २० हायटेक क्लासरुम आणि २४ प्रशिक्षण केंद्रे आहेत. या शिवाय ४०० आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे. आयआयएम नागपूरचे जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारच्या सोयी आहेत.
जागतिक विद्यापीठांसोबत भागिदारी : देशाचे अगदी मध्यवर्ती शहर असणारे नागपूर आयआयएम या संस्थेमुळे व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या नकाशावर आले आहे. इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, जपान, डेन्मार्क, फ्रान्स या देशातील जागतिक स्तराच्या विद्यापीठांसोबत आयआयएमचे सहभागीत्व आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट युनिर्व्हसिटी ऑफ लिले फ्रान्स, वेस्ट मिनिस्टर बिझनेस स्कूल, युनिर्व्हसिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर इग्लंड, युनिर्व्हसिटी ऑफ मेमफीस, अमेरिका, इन्स्टिट्यूट मांइन्स टेलिकॉम, फ्रॉन्स, कोफेनहेगन बिझनेस स्कुल डेनमार्क, स्कूल ऑफ स्टॅटेजिक मॅनेजमेंट जपान आदी विद्यापींठासोबत या संस्थेचा सामजस्य करार झाला आहे.